(नवी दिल्ली)
दिल्लीच्या आप सरकारमधील माजी मंत्री मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांना करण्यात आलेली अटक ही एकप्रकारे केंद्रातील भाजप सरकारकडून छळवणूक करण्याचा प्रकार आहे. देशाच्या माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी अति करीत सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या. त्याचप्रमाणे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील सर्व मर्यादा ओलांडल्या आहेत. एखादी व्यक्ती जेव्हा मर्यादा ओलांडतो, तेव्हा त्याचे परिणाम त्याला भोगावे लागतात, अशी टीका दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी केली आहे.
कथित मद्य धोरण घोटाळाप्रकरणी नुकतीच सीबीआयने दिल्लीचे तत्कालीन उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांना अटक केली आहे, तर मनी लाँड्रिंग प्रकरणात तत्कालीन आरोग्यमंत्री सत्येंद्र जैन मागील ९ महिन्यांपासून तुरुंगातच आहेत. त्यावर भाष्य करताना केजरीवाल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडले आहे. मनीष सिसोदिया यांनी शिक्षण क्षेत्रात उत्तम काम केले आहे. तसेच सत्येंद्र जैन यांनीही आरोग्य क्षेत्रात भरीव काम केले. या दोघांच्याही कामाची दखल जागतिक पातळीवर घेण्यात आली आहे, मात्र भाजपला आप सरकारमधील मंत्र्यांनी केलेले जागतिक दर्जाचे काम रूचलेले नाही. त्यामुळे दोघांनीही खोट्या गुन्ह्यांखाली अटक करण्यात आली, असा आरोप केजरीवाल यांनी केला.
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन जर आज भाजपात गेले, तर उद्या त्यांच्यावरील सर्व खटले रद्द होतील आणि त्यांची सुटका होईल. मुळात भ्रष्टाचार हा मुद्दा नाही, तर तपास यंत्रणांचा वापर करून विरोधकांना त्रास देणे हा केंद्रातील मोदी सरकारचा उद्देश आहे. एकेकाळी माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनीदेखील केंद्रीय तपास यंत्रणांना हाताशी धरून विरोधकांची छळवणूक केली होती. तोच प्रकार आजघडीला मोदी सरकार करीत आहे, असे ते म्हणाले.