(बंगळुरू)
भारतातील पहिल्या क्रमांकामध्ये गणना असणार्या कर्नाटकातील बंदीपूर व्याघ्र प्रकल्पाला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या प्रकल्पाच्या जंगल सफारीवर गेले होते. मात्र त्यांना जंगल सफारीत वाघ दिसलाच नाही. केवळ वाघाच्या ताज्या पावलांचे ठसे पाहायला मिळाले. वाघ दिसला नाही म्हणून पंतप्रधान मोदी हे नाराज झाल्याचे बोलले जात आहे. एवढेच नव्हे तर याला कारणीभूत त्यांच्या जीपचा चालक असल्याचे म्हणत त्याचे निलंबन करावे अशी मागणी आता भाजपच्या काही नेत्यांनी केली आहे.
मधुसूदन नावाच्या वाहन चालकाने पंतप्रधान मोदींना वाघ दाखविण्यासाठी नेताना चुकीचा रस्ता निवडला होता. त्यामुळे त्यांना वाघाचे दर्शन झाले नाही, असे काही भाजप नेत्यांचे म्हणणे आहे. आता त्याच्या वाहनाची नोंदणीच रद्द केली आहे. विशेष म्हणजे पंतप्रधानांच्या जंगल सफारीआधी याच मार्गावरून सुरक्षा रक्षकांनी पाहणी चाचणी केली. त्यावेळी त्यांना पाचही दिवस वाघ दिसले होते. त्यांचे त्यांनी फोटोही काढले होते. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांच्या या जंगल सफारीवेळी त्यांना वाघ वगळता इतर अनेक वन्य प्राण्यांचे दर्शन घडले.त्यामध्ये ४० हत्तींचा कळप, ३० गवे, ३० सांबर याचा समावेश होता. पंतप्रधान मोदी यांना जंगल सफारीत वाघ दिसला नाही म्हणून वाहन चालकाचे निलंबन करण्याची हास्यासपद मागणी आता भाजपच्या काही नेत्यांनी केली आहे.