(पंढरपूर)
जालना येथील एका महिला भक्ताने आपले नाव गुप्त ठेवण्याच्या अटीवर पुन्हा एकदा विठुरायाला तब्बल 55 लाख रुपयांचे हिरेजडित सोन्याचे घोंगडे अर्पण केले. संपूर्णपणे सोन्यामध्ये अतिशय बारीक कलाकुसर केलेले आणि त्याला माणिक आणि पांढरे हिरे बसवलेले हे सोन्याचे घोंगडे 82 तोळे वजनाचे आहे.
गुराखी रुपातील कृष्णाचा अवतार
गुढीपाडव्याच्या दिवशी देवाला सोन्याचा पोशाख करताना त्याचे खांद्यावर घोंगडी हातात सोन्याची काठी असा गुराखी रूपातील कृष्णाचा अवतार केला जात असतो. मात्र विठुरायाच्या खजिन्यात सोन्याची घोंगडी नसल्याने आजवर लोकरीची घोंगडी या पोशाखात देवाच्या खांद्यावर दिली जात असे.
हिरेजडित सोन्याची घोंगडी विठुरायाला अर्पण
आता या महिला भक्ताने दिलेली ही हिरेजडित सोन्याची घोंगडी कृष्णरूपातील पोशाखात वापरली जाणार असून देवाच्या खजिन्यात अजून एका मौल्यवान दागिन्यांची भर पडली आहे. आज या महिला भक्ताच्या साधकांनी मंदिर समितीचे व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्याकडे आणून ही सोन्याची घोंगडी अर्पण केली.
पूर्वी दिले दोन किलो वजनाचे सोन्याचे धोतर
एकाच भक्ताकडून तिसऱ्यांदा मंदिरास असे दान मिळत आहे. यापूर्वी जालनाच्या यांच महिला गेल्यावर्षी मोहिनी एकादशीच्या दिवशी या महिला भाविकाने विठोबाच्या चरणी पावणे दोन किलो वजनाचे सोन्याच्या धोतर,तसेच नाजूक बनावटीचा चंदन हार आणि सुंदर कलाकुसर असणारा कंठा असे सव्वा कोटी रुपये किमतीचे मौल्यवान दागिने अर्पण केले होते. यानंतर याच महिला भाविकाने वसंत पंचमी दिवशी 1 कोटी 80 लाख रुपयांचे दागिने देवाला आणि रुक्मिणी मातेला विवाहासाठी अर्पण केले होते.
55 लाखांची हिरेजडित सोन्याची घोंगडी अर्पण
शुक्रवारी पुन्हा याच महिला भक्ताकडून प्रजासत्ताकदिनी 55 लाखांची हिरेजडित सोन्याची घोंगडी देवाला अर्पण केली आहे. प्रत्येक वेळेला आपले नाव गुप्त ठेवण्याची अट या भाविकांनी ठेवली होती. अगदी मंदिर समितीचा सत्कार देखील स्वीकारायला या महिला भाविक समोर आल्या नाहीत. जालना येथील दत्त मंदिरात या महिला संतांचे मोठे काम असून त्यांचे हजारो अनुयायी असल्याचे समजते.
विठ्ठलाला यापूर्वी सोन्याची घोंगडी दान केलेली नाही. पांडुरंगाला घोंगडी पांघरलेली असते. ही माहिती त्या भाविकाला कुणीतरी दिली असेल त्यामुळे भाविकाने आज २६ जानेवारीच्या निमित्त ८२ तोळे वजनाची ही घोंगडी आहे. दिवाळीतल्या पाडव्याच्या दिवशी लोकरीची घोंगडी विठोबाच्या मूर्तीला परिधान करण्यात येते. त्याऐवजी आता ही घोंगडी आम्ही वापरु. तसंच सोन्याचा दागिना असल्याने तो काही विशिष्ट दिवस पाहूनही घालू शकतो. त्या भाविकाने अगदी मनापासून विठोबाला सोन्याच्या घोंगडीचं दान केलं आहे. नाव जाहीर न करण्याच्या अटीवर हे दान भाविकाने दिलं आहे. त्या भाविकाचा हा मोठेपणा आहे असं आम्हाला वाटतं. मागच्या वर्षीही त्यांनी जसं दान दिलं होतं तसंच यावर्षीही दिलं आहे असं मंदिर प्रशासनाने सांगितलं.