(रत्नागिरी)
शैक्षणिक व सामाजिक संस्था सैतवडे संचलित न्यू इंग्लिश स्कूल सैतवडे या शाळेचे सेवानिवृत्त मुख्याध्यापक माधव गणेश कुलकर्णी यांनी एक लाख रुपयाची रोख देणगी दिली आहे. कुलकर्णी हे शाळेत मुख्याध्यापक म्हणून गेल्या अनेक वर्षापूर्वी रुजू झाले होते. त्यावेळी ही शाळा विनाअनुदानित होती. त्यांच्या व संस्थेच्या अथक प्रयत्नाने शासनाने या शाळेला अनुदान दिले. त्यांनी शाळेचा निकाल मुलांचा सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीने खूपच प्रयत्न केले होते.
निवृत्तीनंतर त्यांचं वास्तव्य कुटुंबासह पुण्यात आहे. बऱ्याच वर्षानंतर त्यांनी आपल्या शाळेचे चतूर्थश्रेणी कर्मचारी रघुनंदन सावंत यांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमासाठी ते उपस्थित होते. शाळेच्या भौतिक गरजांसाठी त्यांनी एक लाख रुपयेची देणगी संस्था अध्यक्ष सज्जादभाई सय्यद यांचेकडे सुपूर्द केली. या शाळेचे, संस्थेचे ऋण मी कधीच विसरू शकत नाही असे त्यांनी बोलताना सांगितले. एव्हढेच नव्हे तर वाटद खंडाळा मिरवणे येथील ग्रामविकास मंडळ संचलित इंग्लिश मिडीयम स्कूल या प्रशालेलाही पंचवीस हजार रुपयाची रोख देणगी अध्यक्ष विष्णूदत्त निमकर यांचेकडे सुपूर्द केली. मुलांना चांगल्या सोयी व उत्तम शिक्षण मिळावे यासाठी हा माझा प्रयत्न आहे, असे ते म्हणाले.
या कार्यक्रमाला सज्जाद सय्यद, अजीज मुकादम, वहाफ खलपे, जावेद काझी, मुस्लिम एज्यू.सोसायटीचे अध्यक्ष माद्रे, मुज्जफर सय्यद, सरपंच सागर कदम, मुख्याध्यापक मुठाल, विलास कोळेकर, सौ.कुलकर्णी, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन सौ.लांजेकर मॅडम यांनी केले. देणगी दिल्याबाबत अध्यक्ष सय्यद यांनी श्री. कुलकर्णी यांचे आभार मानले.