(मुंबई)
न्यूड फोटोशूट प्रकरण रणवीर सिंह ला चांगलेच भोवणार असे चिन्ह आहे. यामुळे अभिनेता रणवीर सिंह याच्या अन्य अडचणीतही वाढ होण्याची शक्यता आहे. एका मासिकासाठी केलेल्या न्यूड फोटोशूट प्रकरणी मुंबई पोलिसांनी त्याच्या घरी जाऊन नोटीस बजावली आहे.
मागील एक महिन्यापासून रणवीर सिंह या फोटोशूटमुळे खूप चर्चेत आहे. इतकेच नाही तर रणवीर सिंहच्या विरोधात अनेक तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार रणवीरला २२ ऑगस्ट रोजी पोलीस ठाण्यात हजर होऊन आपले निवेदन द्यावे लागणार आहे. मुंबई पोलिसांनी काढलेल्या नोटीशीनुसार रणवीर सिंहला २२ ऑगस्टला चेंबूर पोलीस ठाण्यात चौकशीसाठी हजर रहावे लागणार आहे.
मुंबईच्या चेंबूर पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्ह्याची चौकशी सुरू आहे. मुंबई पोलिसांचं पथक रणवीरच्या घरी नोटीस बजावणीसाठी गेले असता तो मुंबई बाहेर असल्याचे दिसून आले. त्यामुळे तो मुंबईत आल्यानंतर त्याला नोटीस बजावण्यात येणार असल्याची माहिती मुंबई पोलिसांकडून देण्यात आली आहे. मात्र या प्रकरणी रणवीरला फिल्म इंडस्ट्रीतून पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. आलिया भट्ट, आमिर खानपासून अर्जुन कपूरपर्यंत सर्वांनी रणवीरच्या फोटोशूटचे समर्थन केले आहे.