(ज्ञान भांडार )
आजकाल सगळीकडे पैसा लागतो. कोणतीही वस्तू कींवा सेवा खरेदी/वापरायची असेल तर त्यासाठी खिशात पैसे असणं आवश्यक आहे. पैसे नसतील तर तुम्हाला कोणतीच गोष्ट मिळू शकत नाही. त्यामुळे प्रत्येक जण पैसा मिळवण्यासाठी धडपड करत असतो. दररोज माणूस खिशात नोटा घेऊन घराबाहेर पडतो. कारण पदोपदी माणसाला या नोटांची गरज भासते. सध्याच्या काळात ऑनलाइन, डिजिटल व्यवहार प्राधान्यानं केले जात असले तरी चलनी नोटांचं महत्त्व कमी झालेलं नाही.
नोटांची निर्मिती कागदापासून होते, असा आपल्या बहुतेक जणांचा समज असला तरी तो चुकीचा आहे. कारण नोटांची निर्मिती चक्क कापसापासून होते. कापूस हा कागदापेक्षा अधिक मजबूत आणि टिकाऊ असतो. त्यामुळे कापसापासून तयार केलेल्या गोष्टी लवकर खराब होत नाहीत. त्यामुळे नोटा तयार करण्यासाठी कापसाचा वापर हा भारतासह अनेक देशांमध्ये केला जातो.
नोटा तयार करण्यासाठी कापसाचा (Cotton) वापर करण्यामागे अनेक करणे आहेत. दैनंदिन वापरातल्या नोटा अनेक जणांकडून प्रवास करत आपल्यापर्यंत येत असतात. अतिवापरामुळे या नोटा लवकर फाटू नयेत, खराब होऊ नयेत, यासाठी नोटांची निर्मिती कापसापासून केली जाते. भारतात नोटांमध्ये 100 टक्के कापसाचा वापर केला जातो.
भारतात चलनी नोटांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असतो. अतिवापरामुळे या नोटा खराब होतात, किंबहुना फाटतात. त्यामुळे दीर्घकाळ नोटा चलनात राहण्यासाठी नोटांची निर्मिती उच्च दर्जाच्या कापसापासून केली जाते. नोटांमध्ये १०० टक्के कापसाचा वापर केला जात असल्याचं `आरबीआय`ने (RBI) स्पष्ट केलं आहे. नोटा जारी करण्याचा अधिकार केवळ रिझर्व्ह बॅंकेलाच (RBI) आहे. केंद्र सरकार आणि अन्य भाग धारकांशी सल्लामसलत करून रिझर्व्ह बँक नोटांच्या पुरवठ्यासाठी विविध चलन छापखान्यांसह मूल्य आणि मागणीनुसार एका वर्षात आवश्यक असलेल्या नोटांच्या प्रमाणाचा अंदाज लावते. दरम्यान, स्वच्छ नोट धोरणानुसार चलनातून परत आलेल्या म्हणजे फाटक्या, मळक्या, खराब झालेल्या नोटांची छाननी करून रिझर्व्ह बँक चलनासाठी योग्य नोटा पुन्हा जारी करते. तर खराब, मळक्या आणि फाटक्या नोटा नष्ट करते.
कापसाच्या धाग्यात लेनिन (Linen) नावाचं फायबर असतं. नोटा तयार करताना कापसासोबत गॅटलीन आणि आधेसिवेस नावाच्या द्रावणाचा वापर केला जातो. यामुळे नोटेचं आयुष्य वाढतं. भारतीय नोटांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने विविध फीचर्सचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या फीचर्समुळे बनावट नोटांना पायबंद बसतो. तसंच भारतीय नोटांचं डिझाइन सातत्यानं बदललं जातं. या सर्व गोष्टींमुळे नोटा अधिक सुरक्षित आणि टिकाऊ असतात.