मुंबई ठाणे शहरात राहणाऱ्या तसेच कामानिमित्त संगमेश्वरहून मुंबई-ठाण्यात येणा्र्या प्रवाशांनाच्या सोयीसाठी नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेसला संगमेश्वर रेल्वे स्थानकात थांबा मिळावा यासाठी आम्ही आग्रही आहोत. झोपेचे सोंग घेतलेल्या रेल्वे प्रशासनाला जागे करण्यासाठी स्वातंत्र्य दिनानिमत्ताने आमच उपोषणाच ठरलयं. आंदोलना संदर्भाचे पत्रही देण्यात आले आहे. आंदोलनाची वेळ रेल्वेमुळे आमच्यावर आली आहे. जर काही वाईट झाल्यास त्यास कोकण रेल्वे जबाबदार असेल. असे निसर्गरम्य चिपळूण आणि निसर्गरम्य संगमेश्वर फेसबुक चे प्रमुख, पत्रकार संदेश जिमन यांनी सांगितले.
संगमेश्वर भागातील १९६ गावातील हजारो कोंकणी रेल्वे प्रवाश्यांच्या वतीने आम्ही उपरोक्त विषयान्वये येत्या १५ ऑगस्ट रोजी एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहोत. या संदर्भात आतापर्यंत अनेकदा पत्रव्यवहार आणि पाठपुरावा करून देखील आमच्या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्षच केले आहे. त्यामुळे संगमेश्वर कोंकण रेल्वे प्रवासी संतप्त झाले आहेत. त्यात १९६ गावातील हजारो स्त्री-पुरुष, लहान-मोठे ग्रामस्थ, संघटना, संस्था, मंडळे, शेतकरी, कामगार, बेरोजगार तरुण, अशा कित्येकांचा समावेश आहे. स्थानिक नेते, पुढारी, राजकीय आणि सामाजिक घटकांचाही या मागणीला पाठिंबा आहे. आता या सगळ्यांनी एकत्र येऊन संगमेश्वर रेल्वे स्थानकात नेत्रावती आणि मत्स्यगंधा एक्सप्रेस या दोन गाड्यांना थांबा मिळावा म्हणून जाहीर एल्गार केला आहे. कोंकण पट्ट्यातील संगमेश्वर तालुका अद्याप अविकसित आहे. त्यामुळे येथील भूमिपुत्रांना सुविधा मिळावी हीच आमची भूमिका आहे. करोनाच्या महामारीतून हळूहळू परिस्थिती निवळत असताना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, त्यासाठी रेल्वे प्रवास सुखकर व्हावा आणि वर नमूद केलेल्या गाड्यातून प्रवास करायला मिळावे, एवढीच आमची मागणी आहे.
दोन वर्षे एकाच मागणीसाठी हजारो संगमेश्वरवासीय पाठपुरावा करत असताना को रे प्रशासन मात्र ढिम्म आहे. त्यासाठी एक दिवसीय लाक्षणिक उपोषणाचा मार्ग आम्ही अवलंबिला आहे. किमान त्यामुळे तरी कोकण रेल्वेचे डोळे उघडतील. हजारो संगमेश्वर कोंकण रेल्वे प्रवाशांच्या वतीने आम्ही मोजके कार्यकर्ते कोविड-१९ चे सर्व नियम पाळून सनदशीर मार्गाने हे उपोषण आंदोलन करणार आहोत.
रत्नागिरी जिल्हा रेड झोनमध्ये आहे. डेल्टा प्लसचा महाराष्ट्रातील पहिला बळी संगमेश्वर तालुक्यात गेला आहे. याची जाणीव कोकण रेल्वेने ठेवावी. अशावेळी संगमेश्वरवासीय भूमिपुत्रांवर अन्याय होऊ नये. राष्ट्रीय महामार्ग ६६ ची दुरवस्था आपण सर्व अनुभवत आहोतच. प्रवासाची खूप गैरसोय आहे. आज महामारीमुळे अनेकांच्या नोकर्या गेल्या आहेत. खाजगी बसेसची दरवाढ न झेपणारी आणि न परवडणारी आहे. दळणवळणाचे सहज व कमी खर्चाचे साधन म्हणून आमच्यासाठी रेल्वे हेच योग्य वाहन-साधनआहे. एखाद्या आजारी माणसाला मुंबईला न्यायचे असेल तर आम्हाला रेल्वेचाच आधार आहे. कोंकण रेल्वे प्रशासनाने या बाबत अनास्था दाखवू नये. एखादा उपेक्षित भीक मागतो, त्याप्रमाणे आम्ही मागणी करत आलो आहोत. पण प्रशासन एवढे निष्ठूर वागत असेल, तर आम्हीसुद्धा एकजुटीने लढा देऊ. सातत्याने पत्रव्यवहार, पाठपुरावा, मागण्यांसाठी निवेदने यातच दिवसामागून दिवस जात आहेत.
संगमेश्वर स्थानकाचे उत्पन्न कमी असल्याचे आम्हाला प्रशासन सांगते, पण वस्तुस्थिती वेगळीच आहे. या स्थानकातून प्रवास करणाऱ्यांकडून मुबलक महसूल कोंकण रेल्वेला मिळतो, असे सिद्ध होते.या सगळ्या संतापातून आम्ही स्वातंत्र्य दिनी १५ ऑगस्ट २०२१ रोजी लाक्षणिक उपोषण करण्याचे ठरवले आहे. कोविड नियमांची आम्ही सर्व ती काळजी घेऊच. पण कोकण रेल्वेनेही या आंदोलनाची जबाबदारी घ्यावी. जर या सनदशीर आंदोलनानंतरही करोनाचा प्रादुर्भाव झाला, आंदोलकांच्या जीवाचे बरे-वाईट झाले, तर सर्वस्वी जबाबदारी कोंकण रेल्वेची असेल. तशी वेळ येऊ नये यासाठी १५ ऑगस्ट पूर्वी या मागणीवर सन्माननीय तोडगा निघावा आणि आमच्या मागण्या बिनशर्त मान्य व्हाव्यात. या संदर्भाचे पत्र रेल्वे अधिकार्यांना दिले. यावेळी ग्रुप चे प्रमुख संदेश जिमन, नरेन्द्र नितेश मालप, शांताराम टोपरे, संजय म्हपुस्कर, प्रसाद नागवेकर तेजस सुर्वे अनंत माईन हे उपस्थित होते. तर संतोष कांबळे, दीपक पवार, गणपत दाभोलकर, जगदीश कदम , मुकुंद सनगरे, वसंत घडशी, चंद्रकांत भेकरे यांचे विशेष सहाकार्य लाभले.