तेजा मुळ्ये,रत्नागिरी.
निसर्गातील कोणताही घटक घेतला तर तो अभ्यासात येतो . त्यामुळे शैक्षणिक व्हॅल्यू असतेच. व्यवसायासाठी अनेक घटक वापरले जातात म्हणून व्यावसाविक मोल देखील काही कमी नाही. कलात्मक मूल्यतर विविध घटकांचे स्वरूप, आकार, स्पर्श, रंग या सर्वांगाने अत्यंत मोलाचं ठरत. पूर्ण जीवन साखळी आपल्याला निसर्गातच मिळते त्यामुळे जैविक विज्ञानाचा निसर्ग हा प्राण आहे. याचाच अर्थ प्रत्येक गोष्टीचा उगम निसर्गाशी निगडीत आहे.
कधीतरी प्रत्येकाने स्वतःच्या फावल्यावेळात निसर्ग आपल्याला जीवन देतो म्हणजे कायकाय देतो याचा विचार केला तर कुठेतरी त्याला आपल्या भारतिय संस्कृती प्रमाणे ‘देता देता देणाऱ्याचे हातही घ्यावे’ ,या उक्ती प्रमाणे पर्यावरण आणि आपण याचा विचार होऊन पर्यावरणीय संतुलन राखण्यात आपली जबाबदारी काय याची जाणीव होईल. आपण आशावादी राहण्यात आणि प्रत्येकाने तो आशावाद सार्थ ठरवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. आपल्याला या सृष्टीचा एक घटक होऊन जीवन व्यतीत करता आलं तरच आपण टिकणार आहोत. मी तरी ठरवलंय निसर्गातील कोणते घटक आपण वापरतो आणि निसर्गाला काय देतो याचा विचार करायचा आणि आपल्या सवयी बदलाव्या लागल्या तरी मी बदल करेन आणि निसर्गाचं देण्या घेण्याच्या नात्यात माझी एक शृंखला मी जोडेन.