(मुंबई)
सध्या राजकारणाची पातळी खूप खालावलेली आपण पाहत आहोत. दोन धर्मातील वादापाठोपाठ आता जाती जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. आमदार अमोल मिटकरी यांनी केलेल्या एका वादग्रस्त विधानावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी सामोपचारासाठी ब्राह्मण संघटनांना भेटीचे आमंत्रण दिले होते. आता ब्राह्मण महासंघाने त्यांची भेट नाकारली आहे. हे आमंत्रण आज शनिवार संध्याकाळचे होते.
आमदार अमोल मिटकरी यांनी लग्न लागताना होणारे मंत्रोच्चार आणि इतर विधीवरून वादग्रस्त विधान केले होते. त्यानंतरच हा वाद निर्माण झाला आहे. अमोल मिटकरींच्या विधानावर शरद पवार यांना हे राजकारण कुठेतरी थांबले पाहिजे असे कळवले होते. मात्र, त्यानंतर छगन भुजबळांनी शरद पवारांच्या उपस्थितीत ज्योतिष, पुरोहित हे धंदा करतात, असा शब्द वापरला होता. त्यांना यावर व्यवसाय हा शब्द वापरता आला असता. पण तो त्यांनी वापरला नाही. त्यानंतर बोलताना पवारांनी यावेळी अशीच काही उदाहरणेही दिली. त्यामुळे भुजबळ आणि मिटकरींच्या वक्तव्याचे समर्थन पवारांनी केले असल्याचे बोलले जाऊ लागले. त्यामुळे आता त्यांचेसोबत बोलण्यासारखे काही उरले नाही, अशी नाराजी व्यक्त करत आपली प्रतिक्रिया आनंद दवे यांनी दिली आहे.
ही सभा सांगली जिल्ह्यातील इस्लामपूरमध्ये झाली होती. या सभेत कन्यादान या विषयावर अमोल मिटकरींनी हे वक्तव्य केले होते. कन्या हा ‘दान’ करण्याचा विषय नाही, असे त्यांनी म्हटले होते. यावर कन्यादानावेळीच्या मंत्रांचा अर्थ मी सांगितला होता, असे अमोल मिटकरी यांनी म्हटले आहे. मी संस्कृतचा जाणकार आहे. अभ्यासक आहे. मला जर कोणते प्रश्न कळाले नाहीत, तर त्याची उत्तरे मी जाणकारांकडून समजून घेईन, असे स्पष्टीकरण मिटकरींनी यावेळी दिले होते. या विधानावरून वाद निर्माण झाला होता.