(मुंबई)
वाहतूक पोलिसांच्या दंडवसुली करण्याच्या पद्धतीवर मुंबई सत्र न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुचाकीच्या चाव्या काढून घेण्याचा अधिकार वाहतूक पोलिसांना नाही. तसेच वाहनचालकाने ड्रायव्हिंग लायसन्स दिल्यानंतर दंडवसुलीसाठी त्याला पोलीस ठाण्यात येण्याची शक्ती केली जाऊ शकत नाही, असेही न्यायालयाने आपल्या आदेशात म्हटले आहे.
आपल्या कर्तव्यात अडथळा आणणे आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याच्या आरोपाखाली वाहतूक पोलिसांनी एका तरुणाला अटक केली होती. सबळ पुराव्याअभावी मुंबई सत्र न्यायालयाने संबंधित तरुणाची निर्दोष मुक्तता केली. यावेळी न्यायालयाने वाहतूक पोलिसांकडून दंड वसूल करण्याच्या पद्धतीवर ताशेरे ओढले.
कुलाबा परिसरात एन,एस रोडवरील सिग्नलवर सागर पाठक नावाचा तरुण विनाहेल्मट दुचाकी चालवाताना वाहतूक चालवत होता. परंतु, वाहतूक पोलीस समोर दिसताच त्याने हेल्मेट घातले. यावेळी वाहतूकीच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी त्याच्यावर दंडवसुलीची कारवाई केली. यावेळी सागरने वाहतूक पोलिसांवर हल्ला केल्याचा आरोप वाहतूक पोलिसांनी केला होता. याप्रकरणी त्याच्याविरोधात भादंवि कलम ३३२ आणि ३५३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच त्याचे ड्राईव्हिंग लायसन्स जप्त करून त्याला मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेण्यात आले होते. २५ मे २०१७ रोजी याप्रकरणातील आरोपीला अटक करण्यात आली. गेल्या सहा वर्षांपासून या घटनेचा खटला सत्र न्यायालयात सुरु होता. यावर मुंबई सत्र न्यायालयाने आता सुनावणी केली.