(संगलट / इक्बाल जमादार)
डिसेंबर महिना उजाडला की नाताळ आणि 31 डिसेंबरची धूम सुरु होते आणि त्याचवेळी राज्य उत्पादन शुल्क विभाग सुद्धा सक्रीय होतो. याच कालावधीत मुंबई गोवा महामार्गावर अवैध दारू वाहतुकीच्या प्रकारात वाढ होताना दिसते. रत्नागिरीचा राज्य उत्पादन शुल्क विभाग सुद्धा अलर्ट झाले असून कारवाईला सुरुवात झाली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज सोमवारी 11 डिसेंबर 2023 रोजी पहाटे ४ वाजता संगमेश्वर एस.टी. स्टँड समोर एक गाडीवर कारवाई केली असून गोवा बनावटी विदेशी मद्याचे विविध ब्रॅण्डचे एकूण 4,65,120/- किंमतीचे 81 बॉक्स जप्त केले आहेत. या प्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.
गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावरुन गस्त घालत असताना गोवा राज्य बनावट दारुची वाहतूक होणार असलेची बातमी खबऱ्याकडून राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाला मिळाली होती. या बातमीप्रमाणे सदर पथकाने संगमेश्वर एस.टी. स्टँड समोरील गोवा-मुंबई राष्ट्रीय महामार्गावर थांबून वाहनांची तपासणी करण्यास सुरुवात केली होती. पहाटे 4.00 वा. चे सुमारास गोव्याच्या दिशेकडून येणाऱ्या राखाडी रंगाच्या चारचाकी मोटार कारला थांबविण्याचा इशारा केला असता पथकाला चुकवून सदर वाहनाचा चालक न थांबता भरधाव वेगाने रिव्हर्स गिअर टाकून तेथून वाहनासह पळ काढण्यास सुरुवात केली. भरारी पथकाला या वाहनाचा संशय आला असताना भरारी पथकाच्या शासकीय वाहनाने अडवून रोखून ठेवून जागीच पकडले. संशयित वाहनातील वाहनचालक याने आपल्या ताब्यातील हयुंडाई कंपनीची क्रेटा या वाहनातून पळ काढत असताना त्यांचा पाठलाग करुन संशयित आरोपी इसमांना पकडण्यात आले.
सदर वाहनचालकाच्या ताब्यातील वाहन क्रमांक एम.एच.07 ए.एस 7301 यामध्ये गोवा बनावटी विदेशी मद्याचे विविध ब्रॅण्डचे एकूण 4,65,120/- किंमतीचे 81 बॉक्स मिळून आले. वाहनासहीत एकूण 16,65,120/- किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. सदर गुन्ह्यातील संशयित आरोपी इसम ओंकार इंद्रजीत सावंत व सहआरोपी वैभव मनोज कांबळी याचे विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम 1949 मधील तरतूदीनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कारवाई आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी, संचालक सुनिल चव्हाण, विभागीय उपायुक्त विजय चिंचाळकर व रत्नागिरी जिल्ह्याचे अधीक्षक सागर धोमकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक संजय दळवी, दु. निरीक्षक सचिन यादव, दु. निरीक्षक शैलेश कदम, जवान वैभव सोनावले, महिला जवान श्रीमती सुजल घुडे, व जवान नि वाहनचालक मलिक धोत्रे यांनी कारवाईत सहभाग घेतला. सदर गुन्ह्याचा पुढील तपास निरीक्षक संजय दळवी, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, रत्नागिरी भरारी पथक करीत आहेत.