(मुंबई)
कोरोनामुळे दोन वर्ष नवरात्रोत्सवाचा उत्साह मावळला होता. मात्र यावर्षी रात्री 12 वाजेपर्यंत रास-दांडिया खेळण्यास परवानगी देण्यात येणार आहे. यंदा राज्य सरकारने मध्यरात्रीपर्यंत खुल्या जागेत रास दांडिया खेळण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी शिंदे गटाचे आमदार प्रकाश सुर्वे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदनाद्वारे केली आहे.
२६ सप्टेंबर ते ४ ऑक्टोबर या काळात नवरात्रोत्सव साजरा होईल. गुजरात, राजस्थान आणि इतर काही राज्यांत दांडियासाठी नऊ दिवस रात्री १२पर्यंत परवानगी दिली जाते. महाराष्ट्रातही अशीच परवानगी द्यावी, अशी मागणी आमदार सुर्वे यांनी केली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री लवकरच या संदर्भातील अंतिम निर्णय जाहीर करतील, असेही सुर्वे यांनी सांगितले.
सध्या तरी नवरात्र उत्सवासाठी दोन दिवसच रात्री १२पर्यंत कार्यक्रम करण्याची परवानगी देण्यात आली आहे. याची विस्तृत कल्पनाही पर्यावरण विभागासह मुंबई पोलिस आयुक्त, महापालिका आयुक्त अशा राज्यातील संबंधित विभागांना देण्यात आली आहे. मात्र मुख्यमंत्री योग्य निर्णय घेऊन रात्री 12 पर्यंत परवानगी देतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.