(मुंबई)
राज्यातील शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी आहे. नमो शेतकरी महा सन्माननिधी योजनेतील पहिला हफ्ता पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात लवकरच जमा होणार आहे, अशी माहिती कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिली आहे. पंतप्रधान किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने नमो शेतकरी महा सन्मान निधी योजना सुरू केली आहे.
या योजनेच्या कार्यवाहीचा आढावा मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत घेण्यात आला. यावेळी कृषी आयुक्त सुनील चव्हाण, कृषी संचालक दिलीप झेंडे, महा आयटीच्या व्यवस्थापकीय संचालक जयश्री भोज, महा आयटीचे विभाग प्रमुख किरण गारग, अमेय सरवणकर, सहसचिव सरिता बांदेकर-देशमुख, श्रेणिक शहा, उपसचिव संतोष कराड, अवर सचिव नीना शिंदे, उपआयुक्त दयानंद जाधव तसेच कृषी व माहिती तंत्रज्ञान या दोन्ही विभागाशी संबंधित अधिकारी उपस्थित होते.
या आढावा बैठकीत कृषी मंत्री धनंजय मुंडे म्हणाले की, नमो शेतकरी महा सन्मान निधी योजनेसाठी पावसाळी अधिवेशनात ४ हजार कोटींचा निधी मंजूर करून घेतला आहे. यामधून योजनेचा पहिला व दुसरा हप्ता शेतकऱ्यांना वितरित केला जाऊ शकतो. राज्यात पावसाने ओढ दिल्यामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत आला आहे. त्यामुळे त्याला तात्काळ नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा पहिला हप्ता देण्याबाबत सरकारकडून हालचाली सुरू आहे.
पंतप्रधान किसान योजनेप्रमाणे नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे मॉड्युल महाडीबीटी पोर्टलवर विकसित करण्याचे काम महाआयटी कडून सुरू आहे. निधीचे वितरण पीएफएमएस प्रणालीतून थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये केले जाणार असल्याने त्यामध्ये योजनेची नोंदणी करण्यात आलेली आहे. विविध तांत्रिक कारणांमुळे पंतप्रधान किसान सन्मान योजनेच्या लाभापासून वंचित राहिलेल्या राज्यातील १२ लाख शेतकऱ्यांना पीएम किसान व नमो महा महासन्मान योजनेचा लाभ देण्यासाठी राज्य सरकारकडून गाव पातळीवर कृषी, महसूल व भूमिअभिलेख विभागाच्या मार्फत विशेष मोहीम सुरू केली होती, त्यांतर्गत आतापर्यंत ४ लाख शेतकऱ्यांनी आपल्या त्रुटी दुरुस्त करून आवश्यक अटींची पूर्तता केली आहे.
भूमि अभिलेख अद्ययावत करणे, ई-केवायसी करणे, आधार बँक खात्यास संलग्न करणे आदी बाबींची पूर्तता उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर करून घ्यावी, असे आवाहन या निमित्ताने धनंजय मुंडे यांनी केले असून, यासाठी या मोहिमेस आणखी सात दिवसांची मुदतवाढ देण्याचे निर्देशही मुंडे यांनी दिले आहेत.
पीएम किसान योजनेच्या धर्तीवर राज्य शासनाने घोषित केलेल्या नमो शेतकरी महासन्मान योजनेचा पहिला हप्ता लवकरच वितरित करण्यात यावा, या अनुषंगाने सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा घेतला.
पावसाळी अधिवेशनात नमो शेतकरी महासन्मान योजनेसाठी 4 हजार कोटींची तरतूद करण्यात आली आहे. यातून… pic.twitter.com/SECdTcQ57v
— Dhananjay Munde (@dhananjay_munde) August 29, 2023