(संगलट-खेड/विशेष प्रतिनिधी)
दापोली तालुक्यातील पांगारी गावच्या नदीकिनारी वाळू उत्खनन करण्यासाठी वापरण्यात येणारी महसूल खात्याने जप्त केलेली क्रेन गायब झाली असल्याची चर्चा सुरू आहे.
दापोली तालुक्यातील पगारी तर्फे हवेली गाव वाशिष्टी नदीलगत असून, या सदरच्या प्लॉटवर खाडीकिनारी पासून सुमारे पन्नास किलोमीटर अंतरावर एक चोरटी वाळू उत्खनन करण्यासाठी वापरण्यात येणारी क्रेन महसूल पथकाला ऑक्टोबर 2021 मध्ये मिळून आली होती. सदरची क्रेन मंडल अधिकारी यांनी मोठ्या कौशल्याने जप्त केली होती आणि त्याला सील करून उभी करून ठेवण्यात आले होते. सदरची सील केलेली क्रेन गेल्या दोन दिवसापासून गायब असल्याची चर्चा सध्या पांगारी गावाबरोबरच दापोली तालुक्यामध्ये सुरू आहे
सदरच्या जप्ती केलेल्या क्रेनची सील तोडून काही वाळू सम्राट मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन करत होते. तसेच 2020 मध्ये रत्नागिरीचे अधिकारी येऊन देखील त्यावेळी सील करण्यात आले होते अशी माहिती मिळत आहे. मात्र वाळू सम्राटाने महसूल खात्याच्या कारवाईला न जुमानता रात्रदिवस वाळू उत्खनन सुरु ठेवली होती. मात्र अचानक आता क्रेन गायब होण्याचा हा प्रकार काय? सदर मंडळ अधिकारी यांनी पंच यादी घातली त्यावेळेस क्रेनच्या बेकेटला वाळू चिकटलेली दिसत होती. त्यावेळी क्रेन चा वापर वाळूसाठी अनधिकृतपणे करण्यात येत असल्याचे पंच यादीमध्ये त्यावेळी नोंद देखील करण्यात आली होते. एवढी मोठी अवजड क्रेन सदरच्या जागेतून अचानक कशी गायब झाली याबाबत शंका कुशंका व्यक्त केल्या जात आहेत. तर महसूल खात्याने त्वरीत दखल घेऊन संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आता होत आहे.
मंडल अधिकारी श्री पारदुले यांची प्रतिक्रिया :
मंडल अधिकारी श्री पारदुले यांना याबाबत पत्रकारांनी विचारले असता, त्यानी सांगितले की आम्ही जप्त केलेली क्रेन संबंधित गावच्या पोलीस पाटील यांच्या ताब्यात देण्यात आली होती. मात्र आता आम्ही योग्य ती चौकशी करून दखल घेतली जाईल v योग्य ती कारवाई केली जाईल असे सांगितले