(देवरुख)
देवरूख नगर पंचायत ने 10 तारखेच्या पूर्वी घाईघाईत अनेक योजनांचा सपाटा लावला आहे. ठराव मंजूर करून ठेवले, नळपाणी योजनेंतर्गत नळ जोडणी केली, रस्ते डांबरीकरण, प्याचिंग केले, अशी अनेक विकासात्मक कामे केली गेली आहेत. परंतु काही ठिकाणी रस्ते, गटारे, यांची कामे करण्यात आलेली नाहीत. मात्र मोठे मोठे प्रोजेक्टचे ठराव मंजूर करण्यात आल्याची चर्चा नागरिकांमध्ये करण्यात येत आहे. अशा परिस्थितीत नळपाणी कनेक्शन देताना नियमानुसार ग्राहकाकडून खर्च वसूल करण्यात आला. पण चांगल्या रस्त्याची वाट लावण्यात येऊन चरी भरण्यात न आल्याने एक आगळा वेगळा स्पीडब्रेकर तयार झाला आहे.
पटवर्धन यांचे घरा समोर, त्यानंतर शिवाजी महाराज चौक ते पोलीस स्टेशन जाणाऱ्या रस्त्यावर चरी मारून ती भरण्यात आलेली नाही. दोन वर्षापूर्वी बचत भवन ते सावरकर चौक पर्यंत पूर्व नियोजन न करता गटाराचे काम करण्यात आले होते. परंतु गटाराचे पाणी साखरपा ते संगमेश्वर या 32 कोटी पेक्षा जास्त खर्च करण्यात आलेल्या रस्त्यावरच सोडण्यात आलेले असून त्याकडे संबंधित अधिकारी वर्गाचे लक्ष नसल्याचे चित्र आहे.
सावरकर चौक ते पाटगाव पुल पर्यंत रस्ता खराब आहे. मारुती मंदिर ते तहसीलदार कार्यालयाकडे जाताना खड्डे पडले असून ते अद्याप भरलेले नाहीत. गटारे साफ करताना काढलेली माती रस्त्यावरच ठेवण्यात आलेली आहे. पोलीस स्टेशन देवरूख ते मराठा भवन पर्यंत रस्ता खराब आहे. अशा अनेक ठिकाणी प्रश्न असून पावसाळ्यापूर्वी नगरपंचायत देवरूख ने त्वरित उपाययोजना करावी असे सामाजिक कार्यकर्ते व महाराष्ट्र समविचारी मंच रत्नागिरीचे संगमेश्वर तालुका अध्यक्ष मनोहर गुरव यांनी सांगितले आहे. याबाबत कार्यालयाला संदर्भीय फोटोंसह अर्ज देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.