हल्लीच्या नवयुगात लोक बरेचदा मन आणि शरीर शांत ठेवणेच विसरतात. शरीर थकले असेल, पण मन शांत राहिले तर शरीर नेहमी निरोगी असते. शरीर आणि मन दोन्ही शांत आणि निरोगी ठेवण्याचा सर्वात सोपा आणि फायदेशीर मार्ग म्हणजे ‘ध्यान’ करणे. पण अनेकांना ध्यान आणि ध्यान काय आहे आणि ते कसे करायचे हे माहित नसते. ध्यान हे एक तंत्र आहे जे मन शांत आणि स्थिर ठेवते. तुमचे मन जितके शांत होईल तितकेच कामाकडे अधिक लक्ष दिले जाईल. म्हणून, दररोज ध्यान करणे आवश्यक आहे, पण ध्यानाचा अर्थ फक्त डोळे मिटून बसणे नाही.
ध्यानाचा मुख्य हेतू तुमचे मन शांत करणे आणि हळूहळू तुमच्या मनाची आंतरिक शांती एका उच्च स्थानावर नेणे आहे. शांत आणि केंद्रित व्यक्ती सहजपणे आपले ध्येय साध्य करू शकते. असे मानले जाते की ध्यान केवळ आश्रम किंवा शांत ठिकाणी केले जाऊ शकते. परंतु, जर तुमच्याकडे सराव असेल तर तुम्ही घरी ध्यान करू शकता. ध्यान करण्यासाठी काही नियम, पथ्य पाळणे आवश्यक असते.
१. शांत, निवांत खोली निवडावी.
२. मंद प्रकाश योजना असल्यास अतीउत्तम. भगभगीत प्रकाश नसावा. मंद वासाची उदबत्ती लावल्यास वातावरणनिर्मिती उत्तम होते. परंतु धुराची एलर्जी असल्यास वा अस्थमा त्रास असल्यास उदबत्ती टाळणे योग्य.
३. सुखासन वा स्वस्तिकासनासारख्या सुखकारक आसनात बसावे. आरामखुर्चीत बसले तरी चालेल. १० ते १५ मिनिटे बसता येणे हीच आवश्यकता आहे. सुखासन वा स्वस्तिकासनात बसल्यास हात गुढघ्यावर सैल ठेवावेत. पद्ममुद्रेप्रमाणे एका हाताचा तळवा दुसऱ्या हाताच्या ओंजळीत, अग्रबाहू मांडीवर स्थित (आधारासाठी) व अकृत्रिमपणे सरळ बसावे. हे शक्य नसेल तर आराम खुर्चीत बसले तरी चालेल. हात खुर्चीच्या हातावर सैलसर ठेवावेत. शरीराची थोडीफार हालचाल चालते, पण मध्येच उठावयास लागल्यास मेडीटेशनचा भंग होतो, म्हणून खबरदारी घ्यावी.
४. शवासनात आपण पायाकडून डोक्यापर्यंत शरीर शिथिल करतो. इथे मात्रत्याविरुद्ध म्हणजे डोक्यापासून पायापर्यंत अवयव एकामागून एक असे शिथिल करीत जावे.
५. सुखेनैव आसनस्थित झाल्यावर डोळे मिटून घेऊन वर सांगितल्याप्रमाणे डोक्यापासून पायापर्यंत अवयव एकामागून एक अवयव आठवून क्रमाने शिथिल करीत जावे. कपाळ, कान, गाल, मान, पाठ ते नितंबापर्यंत, त्यानंतर गळ्यापासून ते पोटापर्यंत, नंतर हात व पाय असा क्रम ठेवावा. पोटाचा विचार करताना श्वासाचा विचार अवश्य करावा. ह्या सर्व प्रकाराला एक ते दीड वा जास्तीत ज्यास्त दोन मिनिटे पुरे होतात.
६. आता आपण बीज मंत्र मनातल्या मनात म्हणावा, ज्या योगे मनातील विचार बाजूस सारता येतील. बीज मंत्र म्हणावयाचा नसेल तर साक्षीभवना अभ्यास करावा. या योगे मन शांत रहाते त्याचा अनुभव घ्यावा.
७. साक्षीभावनाही कठीण वाटत असेल तर हिमालायाच्या शिखरासारख्या निर्मळ गोष्टीचा विचार करावा.
८. आपण सुखकारक स्थितीत असलो तरी शावासनस्थ नसल्यामुळे झोप लागण्याची शक्यता कमी असते. परंतु सवयीच्या अभावामुळे १५ मिनिटात चुळबुळ होतेच वा पायांना मुंग्या आल्यासारखे वाटते. अन्यथा वेळ समजण्यासाठी घड्याळाचा गजर लावण्यास हरकत नाही.
९. सावकाश डोळे उघडावे. हातापायाची जाणीवपूर्वक हालचाल करावी. उत्तम मेडीटेशन जमल्यास रक्तदाब कमी होण्याची शक्यता असते व हृदयाचे ठोकेही मंद होतात. म्हणून मेडीटेशन मधून सावकाश बाहेर येत उभे रहाणे श्रेयस्कर होय.
जेव्हां १०० लोक एकत्रितपणे साधना करतात तेंव्हा त्यांच्या लहरी जवळजवळ ५ कि.मी. पर्यंत पसरतात आणि नकारात्मकता नष्ट करून सकारात्मकता निर्माण करतात. आइन्स्टाईनने शास्त्रीय दृष्टिकोनातुन सांगितले आहे की, एका अणुचे विघटन केल्यास तो त्याच्या शेजारील अनेक अणूंचे विघटन करतो. त्यालाच आपण अणुविस्फ़ोट म्हणतो. हीच गोष्ट आपल्या ऋषी-मुनीनी आपल्याला हजारो वर्षांपूर्वी सांगितली आहे की, पृथ्वीवरील केवळ ४% लोकच ध्यान करतात, त्याचा फायदा उर्वरीत ९६% लोकांना होतो. आपणसुद्धा जर ९० दिवस सलग ध्यान केले तर आपल्या कुटुंबातील इतर व्यक्तींवरील सकारात्मक परिणाम आपल्यास दिसून येईल.
जर पृथ्वीवरील केवळ १०% लोक ध्यान करतील तर पृथ्वीवरील सर्व समस्या नष्ट करण्याची ताकद ध्यानामध्ये आहे. महर्षी महेश योगी यांनी १९९३ मध्ये शास्त्रज्ञांपुढे हे सिद्ध केले आहे. त्यांनी ४००० शिक्षकांना वॉशिंग्टन डी सी मध्ये बोलावून त्यांना एक महिना ध्यानाभ्यास करावयास सांगितले. त्यामुळे त्या शहरातील गुन्ह्यांचे प्रमाण ५० टक्क्यांनी कमी झाले. शास्त्रज्ञाना याचे कारण कळले नाही म्हणुन त्यांनी याला “महर्षी इफेक्ट” असे नाव दिले. ध्यानामधील ही ताकद आहे. आपण आपली भौतिक तसेच अध्यात्मिक प्रगती ध्यानामुळे कमी श्रमात साधु शकतो. गरज आहे ती फक्त ध्यानातून स्वत:चा शोध घेण्याची.
@ धनंजय देशपांडे