(रत्नागिरी)
रत्नागिरी तालुक्यातील धामणसे सांब्रेवाडी येथे अंगणात उभ्या असलेल्या एका ग्रामस्थाच्या पुढ्यात बिबट्याने उडी मारल्याचा प्रकार रात्री नऊ ते दहा वाजण्याच्या दरम्यान घडला. ही माहिती मिळाल्यानंतर वनविभागाचे प्रादेशिक वनाधिकारी प्रकाश सुतार रात्री उशिरा संबंधित ग्रामस्थाच्या घरी धावले. त्यांची भेट घेऊन संवाद साधला आणि बिबट्याला टॅप करण्यासाठी कॅमरेही लावले. वनविभागाच्या या तत्परतेमुळे ग्रामस्थांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे.
प्रादेशिक वनाधिकारी सुतार यांनी नुकताच रत्नागिरी येथे पदभार स्वीकारला आहे. रत्नागिरी तालुक्यासह संगमेश्वर, लांजा व राजापूरचे कार्यक्षेत्र असलेल्या या विभागात बिबट्याचे हल्ले, वावर ही नित्याचीच बाब झाली आहे. मागील आठवड्यात सांब्रेवाडी येथे रात्रीच्यावेळी एका ग्रामस्थाच्या पुढ्यात बिबट्याने उडी मारली. बिबट्याच्या दर्शनामुळे संबंधित ग्रामस्थाची गाळणच उडाली होती. बिबट्या पळून गेल्यामुळे जीवात जीव आला.
ही माहिती वनविभागाचे अधिकारी सुतार यांच्यापर्यंत पोचली. ते रात्री उशिरा संबंधित ग्रामस्थाच्या घरी दाखल झाले. त्यांनी संवाद साधून सुरक्षिततेसाठी उपाययोजना करण्याचे आश्वासनही दिले. वनाधिकारी घरी आल्यामुळे ग्रामस्थांना दिलासा मिळाला.
बिबट्याला ट्रॅप करण्यासाठी वनविभागाकडून सांबरेवाडी परिसरात सहा कॅमेरे लावले; परंतु बिबट्याने त्या परिसरात पुन्हा दर्शन दिले नाही. तो बिबट्या सावजाच्या मागून चुकून तिथे आला असावा, अंदाज बांधला जात आहे. याबाबत वनाधिकारी सुतार म्हणाले, बिबट्याचे फिरण्याचे क्षेत्र सर्वसाधारण बारा किलोमीटरचा परिसर असतो. त्यामुळे तो एकाच ठिकाणी पुन्हा सारखा येईलच, असे नाही.