(मुंबई)
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे गटाला आणखी एक जोरदार धक्का देण्याची तयारी केली आहे. शिवसेना चिन्ह्याबाबत लवकर निर्णय घेऊन हे चिन्ह आम्हाला प्रदान करावे अन्यथा ते त्वरित गोठवावं अशा मागणीचे पत्र शिंदे गटाने निवडणूक आयोगाला लिहिले आहे. अंधेरी पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धनुष्यबाण हे शिवसेनेचे निवडणूक चिन्ह आम्हाला मिळावे किंवा ते गोठवण्याबाबत तातडीने काही आदेश द्यावा अशा शब्दांत शिंदे गटाने निवडणूक आयोगाला सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात मागणी केली आहे.
शिवसेनेतील उभ्या फुटीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गट एकमेकांसमोर आले आहेत. शिवसेनेवर हक्क कुणाचा यासाठी वर्चस्ववादाची लढाई सुरू आहे. पक्षाचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण कुणाला मिळणार यावर आज (शुक्रवार) केंद्रीय निवडणूक आयोग निर्णय देण्याची शक्यता आहे. यातच आता चिन्ह आम्हाला मिळावे, अशी मागणी शिंदे गटाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे केली आहे. याबाबत शिंदे गटाकडून निवडणूक आयोगाला पत्र लिहिण्यात आले आहे.
अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाकडून धनुष्यबाण चिन्हाचा गैरवापर होण्याची तक्रार पत्रात केली आहे. धनुष्यबाण आम्हालाच देण्यात यावे, अशी मागणी या पत्राद्वारे केली आहे. येत्या अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठीच चिन्ह मिळावण्याचा प्रयत्न शिंदे गटाकडून केला जात आहे. आता शिंदे गटाच्या मागणीवर निवडणूक आयोग काय निर्णय घेणार, हे आज समजणार आहे. तर धनुष्यबाण चिन्हावर दावा करण्यासाठी एकनाथ शिंदे गट आज निवडणूक आयोगाला प्रत्यक्ष भेटणार असल्याचे खासदार राहुल शेवाळे यांनी सांगितले आहे.
निवडणूक आयोगाने दोन्ही गटांना आपली बाजू मांडायला सांगितली आहे. अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघासाठी पोटनिवडणूक जाहीर झाली असून उद्यापासून अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होत आहे. त्यामुळे दोन्ही पक्षाकडून चिन्ह मिळवण्यासाठी जोरदार प्रयत्न केले जात आहेत. यासाठी दोन्ही गटाकडून पुरावेही सादर केले गेले आहेत.