(खेड)
शहरातील छत्रपती मराठा नागरी सहकारी पतसंस्थेस कर्जाच्या परताव्यापोटी दिलेला धनादेश न वटल्याप्रकरणी व न्यायालयीन दाव्याच्या सुनावणीस अनुपस्थित राहिल्याप्रकरणी येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी संजय चव्हाण यांनी योगेश सतीश मपारा (रा. भरणे) यांना १ वर्ष साध्या कैदेच्या शिक्षेसह दंडाची शिक्षा सुनावली आहे.
मपारा यांनी छत्रपती मराठा नागरी सहकारी पतसंस्थेकडून सप्टेंबर २०१६ मध्ये ९ लाख रूपये कर्ज घेतले होते. घेतलेल्या कर्जाचा परतावा म्हणून सेन्ट्रल बँक ऑफ इंडियाच्या येथील शाखेचा ३ लाख रूपयांचा धनादेश पतसंस्थेस दिला होता. हा धनादेश न वटल्याने पतसंस्थेच्यावतीने येथील न्यायालयात खटला दाखल करण्यात आला होता.
या खटल्याच्या सुनावणीस मपारा हे अनुपस्थित राहून न्यायालयाचा अनादरही केला. या प्रकरणी न्यायालयाने त्यांना २ वर्ष साधी कैद व ७ लाख २० हजार. रूपये नुकसान भरपाई तसेच प्रकरण दाखल झाल्यापासून ९ टक्के द्रवदंडाची शिक्षा सुनावली आहे. तसेच दंड न भरल्यास अतिरिक्त २ महिने कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. पतसंस्थेच्यावतीने अॅड. संदेश चिकणे, ॲड. केतकी जाधव, अॅड. दिया देवळेकर यांनी काम पाहिले.