एकाच कुटुंबातील तब्बल चार जणांनी विष पिऊन पुण्यामध्ये आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळं संपूर्ण पुणे शहरात खळबळ उडाली असून मृतांमध्ये दोन मुलांचाही समावेश आहे. पुण्यातील मुंढवा परिसरात ही घटना घडली असून त्यात पती-पत्नी आणि दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणाची चौकशी करण्यात येत आहे.
दीपक थोटे (५९), इंदू दीपक थोटे (४५) मुलगा ऋषिकेश दीपक थोटे (२४), मुलगी समीक्षा दीपक थोटे (१७) अशी आत्महत्या केलेल्या चौघांची नावे आहेत. २ महिन्यापूर्वी ते मुंढवा भागातील केशवनगर परिसरात वास्तव्यास आले होते. शेयर मार्केटमध्ये कुटुंबाचं मोठं आर्थिक नुकसान झाल्यामुळंच या आत्महत्या झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. या कुटुंबाकडून शेयर मार्केटमध्ये लाखो रुपये गुंतवले गेले होते. परंतु त्यात मोठं नुकसान झाल्यामुळं पतीसह पत्नीनं टोकाचं पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे.
कुटुंबातील लोकांनी नेमकी कधी आत्महत्या केली हे अद्याप स्पष्ट झालेलं नसून शेजारी राहणाऱ्या नागरिकांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी याची माहिती तातडीनं पोलिसांना दिली, त्यानंतर आता पोलिसांनी घटनास्थळी दाखल होऊन प्रकरणाची चौकशी सुरू केली. चारही व्यक्तींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले गेले आहेत. दरम्यान, पोलिसांनी ही आत्महत्या आहे की घातपात आहे, याचीही चौकशी पोलीस करीत आहेत.