( मुंबई )
द एलिफंट व्हिस्परर्स या ऑस्कर विजेत्या माहितीपटात काम करणाऱ्या बोमन आणि बेली या आदिवासी जोडप्याने दिग्दर्शिका कार्तिकी गोन्साल्विस आणि सिख्या एंटरटेनमेंटवर गंभीर आरोप केले आहेत. निर्मात्यांनी पैसे दिले नसल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यामुळे ऑस्कर जिंकूनही त्यांच्या पदरी निराशाच पडल्याचे त्यांनी सांगितले.
४ ऑगस्ट रोजी दिलेल्या एका मुलाखतीत या जोडप्याने चित्रपट निर्मात्यांवर आर्थिक शोषण आणि छळ केल्याचा आरोप केला आहे. या जोडप्याने म्हटले की, माहितीपटच्या शूटिंगदरम्यान कार्तिकी गोन्साल्विस त्यांच्याशी खूप प्रेमाने आणि आदराने वागत होती. मात्र, या चित्रपटाला ऑस्कर मिळाल्यानंतर तिचे वागणे एकदम बदलले. ऑस्कर मिळाल्यानंतर कार्तिकी अंतर राखून वागू लागली.
या जोडप्याने मुलाखतीत लग्नाच्या सीनच्या शुटिंगसाठी केलेल्या खर्चाचा उल्लेख केला. बेलीने आरोप केला आहे की, तिच्या नातवाच्या शिक्षणासाठी वाचवलेले पैसे तिला लग्नाच्या सीनसाठी खर्च करावे लागले. ‘कार्तिकीने सांगितले की, तिला लग्नाचा सीन एका दिवसात शूट करायचा आहे. मात्र, तिच्याकडे त्यासाठी पैसे नसल्याने आम्हाला व्यवस्था करण्यास सांगितले. यासाठी एक लाख रुपये खर्च आला. कार्तिकीने आम्हाला पैसे परत करण्याचे आश्वासन दिले होते, पण ते पैसे तिने अद्याप दिले नाहीत.’