जागा, प्लॉटच्या वादासंदर्भात पत्नीने आणि सासऱ्याने केलेल्या अर्जावर कारवाई न करण्यासाठी दोन लाख रुपये
लाच मागणाऱ्या पुणे पोलीस दलातील सहायक पोलीस निरीक्षकावर पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे. स्वराज आनंद पाटील असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सहायक पोलीस निरीक्षकाचे नाव आहे. पुणे एसीबीकडून कोंढवा पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत 34 वर्षाच्या एका व्यक्तीने पुणे लाचलुचप प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. तक्रारदार यांचा पत्नी व सासरे यांच्यात जागा, प्लॉटचा वाद आहे. या वादासंदर्भात कोंढवा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज करण्यात आला होता. तक्रार अर्जावरुन कारवाई न करण्यासाठी आणि सहकार्य करण्यासाठी सहायक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील यांनी दोन लाख रुपये लाच मागितली. तक्रारदार यांना लाच देणे मान्य नसल्याने त्यांनी पुणे एसीबीकडे तक्रार केली होती.
पुणे एसीबीच्या पथकाने या प्रकरणातील पडताळणी केली. पडताळणी दरम्यान सहायक पोलीस निरीक्षक स्वराज पाटील यांनी तक्रारदार यांच्याकडे कारवाई न करण्यासाठी व सहकार्य करण्यासाठी दोन लाख रुपये लाच मागितल्याचे निष्पन्न झाले. याप्रकणी पुणे एसीबीने गुरुवारी (दि.24) कोंढवा पोलीस ठाण्यात स्वराज पाटील यांच्यावर गुन्हा दाखल केला.