(मुंबई)
राज्यात एकूण 50 हजार शिक्षकांची भरती केली जाणार असून पहिल्या टप्प्यात 30 हजार शिक्षकांची भरती केली जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात जवळपास 20 हजार शिक्षकांची भरती केली जाईल, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. तसचं आधार व्हेरिफिकेशन विद्यार्थ्यांचे पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील शिक्षक भरती यासंदर्भात आकडा कळेल, असंही त्यांनी म्हटलं. केसरकर यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी ही घोषणा केली आहे. तसेच, शंभर टक्के ही शिक्षक भरती होणार आहे, असंही केसरकर म्हणाले.
शिक्षकांच्या बदलीसंदर्भात ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत भेट घेऊन चर्चा करणार असल्याचं दीपक केसरकर यांनी सांगितलं. माध्यमिक शिक्षकांनुसार प्राथमिक शिक्षकांच्या बदल्या सुद्धा रद्द करता येतील का? जेणेकरुन शिक्षक स्थिर होतील, याबाबत महाजन यांच्यासोबत चर्चा केली जाईल. तसंच प्रत्येक शिक्षकाला आपल्या गावातच पोस्टिंग मिळेल असं नाही, मात्र जवळच्या गावात पोस्टिंग देता येईल, असं केसरकर यांनी म्हटलं.
शिक्षकांची बदली झाली नाही तर एक जबाबदारीची जाणीव शिक्षकांमध्ये असते. एखादा शिक्षक अजिबात चांगला शिकवत नसेल तर त्याच्या संदर्भात वेगळे निर्णय घ्यावे लागतील. आतापर्यंतच्या शिक्षकांची शिक्षा म्हणून बदली करावी लागायची. आता बदली न करता त्या शिक्षकांना ट्रेनिंग द्यावी लागेल, असं दीपक केसरकर म्हणाले.