नरेंद्र मोदी यांनी गुजरात येथील विविध योजनांमधल्या लाभार्थ्यांच्या एका कार्यक्रमात व्हिडिओ कॉन्फ्रंसिंगद्वारे उपस्थिती लावली होती. त्यावेळेस त्यांनी आपण दोनदा पंतप्रधान झाल्यानंतरही थांबणार नसून देशातील जनतेसाठी यापुढेही सक्षम नेतृत्व करणार असल्याचे सांगितले. मी एका वेगळ्या धातूचा बनलो आहे, मला दोनदा पंतप्रधान पद भूषवता आल्यानंतरही मी थांबणार नाही. मला जनतेसाठी अजूनही खूप काही करायचं आहे. लोकांच्या भल्यासाठी अनेक योजना अजूनही माझ्या डोक्यात आहेत. अनेकांना असं वाटत असेल की, दोनवेळा पंतप्रधान झाल्यावर मी थांबेन, तर त्यांनी तो विचार डोक्यातनं काढून टाकावा असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.
यावेळी ते म्हणाले, एक दिवस देशातले एक मोठे नेते माझ्या भेटीला आले. ते नेहमी माझ्या धोरणांवरुन माझ्यावर टीका करतात. मात्र मी त्यांचा नेहमी सन्मान करतो. काही राजकीय बाबतीत त्यांचे माझे मतभेद आहेत. माझी भेट घेतल्यावर त्यानी मला विचारलं की, तुम्ही दोनदा देशाचे पंतप्रधान झालात, आता तुम्हाला आणखी काय हवंय !
त्यांच्या म्हणण्यानुसार जो देशाचा दोनवेळा पंतप्रधान होतो तो सर्व भरुन पावतो, सुखी समाधानी असतो अशी त्यांची समजूत होती. मात्र त्यांना माहित नाही मोदी कोणत्या मातीचा बनला आहे. ही गुजरातची माती आहे. मला कोणत्याही परिस्थितीत कमी पडून चालणार नाही. मी त्यावर विश्वासही ठेवत नाही. जे करायचं शक्य होतं ते केलं, आता थोडा आराम करायला हवा, असा विचार करणाऱ्यांपैकी मी नाही. सरकारच्या अनेक योजना अजूनही मला लोकांपर्यंत न्यायच्या आहेत असं आपण म्हणाल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कार्यक्रमादरम्यान कोणत्याही राजकीय नेत्याचं नाव घेतलं नाही. मात्र गेल्या काही दिवसांमध्ये मोदींना भेटायला आलेल्या त्यांच्या राजकीय विरोधकांमध्ये काही नावांपैकी दोन नावं महत्वाची असल्याचे बोलले जाते. त्यापैकी एक नाव म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि दुसरं नाव म्हणजे शिवसेना नेते संजय राऊत. मात्र पंतप्रधान मोदी यांना ‘एक मोठे नेते’ म्हणून कोणचे नाव त्यांच्या मनात आहे, ते कोणाला उद्देशून बोलले याचा आपण फक्त अंदाजच बांधू शकतो.