(नवी दिल्ली)
देशात अग्रगण्य बँक असलेल्या भारतीय स्टेट बँकेत १ जानेवारी २०१७ ते सप्टेंबर २०२२ या कालावधीत ८० हजार ८६५.३४ कोटी रुपयांच्या फसवणुकीची तब्बल २२ हजार ७२२ प्रकरणे घडली आहे. त्यापैकी सर्वाधिक ६ हजार ९३९ प्रकरणे २०२० या कोरोना काळातील असून सामान्य काळापेक्षा हा आकडा चारपट अधिक असल्याची धक्कादायक माहिती माहितीच्या अधिकारातून पुढे आली.
धक्कादायक बाब म्हणजे स्टेट बँकेच्या देशभरातील शाखेत २०१७ ते सप्टेंबर २०२२ या काळात ६३४.४१ कोटींची फसवणूक झाली आहे. या संदर्भात माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहिती दिली. अभय कोलारकर यांना मिळालेल्या माहितीनुसार, स्टेट बँकेतील देशभरातील शाखांमध्ये २०१७ मध्ये २ हजार ३२४.३७ कोटींच्या फसवणुकींची १ हजार ३०२ प्रकरणे घडली आहेत.
२०१८ मध्ये ८ हजार ७६४.७७ कोटींच्या फसवणुकींची २ हजार ५९१ प्रकरणे घडली आहेत. २०१९ मध्ये ३४ हजार ६२८ कोटींच्या फसवणुकींची ५ हजार ४८८ प्रकरणे, २०२० मध्ये २३ हजार ७७३.६४ कोटींची ६ हजार ९३९, २०२१ मध्ये ६ हजार १३२.३० कोटींच्या फसवणुकींची ४ हजार १०९ प्रकरणे घडली आहेत, तर १ जानेवारी २०२२ ते सप्टेंबर २०२२ पर्यंत ५ हजार २४१.९३ कोटींच्या फसवणुकीची २ हजार २९३ प्रकरणे घडली आहे.
घोटाळ्यात ६१० कर्मचा-यांचा सहभाग
स्टेट बँकेच्या या महा घोटाळ्यात बँकेतीलच ६१० कर्मचा-यांचा सहभाग असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. माहितीच्या अधिकारातून मिळालेल्या माहितीनुसार सर्वाधिक १७५ कर्मचा-यांचा सहभाग २०१८ मध्ये होता.