(मुंबई)
कोकण रिफायनरीवरून रत्नागिरीतील वातावरण तापत असून स्थानिकांनी बारसू रिफायनरी प्रकल्पासाठी मोठा विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महत्वपूर्ण वक्तव्य केलं आहे. रिफायनरी प्रकल्प कोकणातील नियोजित ठिकाणीच होईल व राज्याच्या विकासासाठी हा प्रकल्प लवकरच पूर्ण केला जाईल असे फडणवीस यांनी स्पष्ट केले. एका वृत्तवाहिनीशी बोलताना फडणवीसांनी रिफायनरीबाबत आपली भूमिका स्पष्ट केली.
या प्रकल्पविरोधात सुरू आंदोलनावर फडणवीसांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. रिफायनरी विरोधातील आंदोलनात काही खरे आंदोलक असतीलही मात्र अनेक जण सुपारी घेतलेले दिसतात. रिफायनरीला विरोध करणाऱ्यांच्या मनातील शंका दूर केल्या जातील. राज्यात कोणताही प्रकल्प आला की, त्याला विरोध केला जातो. आरे कारशेडलाही विरोध करण्यात आला. येथेही सामान्य लोकांना पुढे करून आंदोलनाचे राजकारण केले जात आहे. निष्पाप लोकांच्या खांद्यावर बंदूक ठेवून विरोध सुरू असल्याचे त्यांनी म्हटले.
देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं की, रिफायनरी हा प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय नाही. तसेच रिफायनरीमुळे निसर्गाला कोणताही धोका नाही. आंदोलकांच्या मनातील शंका दूर केल्या जातील. बारसूतील जागा रिफायनरीसाठी योग्य असल्याचा अहवाल आल्यानंतर तेथे रिफायनरी प्रकल्प उभारला जाणार आहे. या प्रकल्पामुळे राज्याच्या विकासाला मोठा हातभार लागणार आहे. या प्रकल्पामुळे प्रत्यक्षपणे एक लाख लोकांना रोजगार मिळणार असल्याचा दावा फडणवीसांनी केला आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले की, आम्हाला हा रिफायनरी प्रकल्प प्रतिष्ठेचा विषय करायचा नाही. महाराष्ट्राचा विकास करायचा आहे. आंदोलकांच्या मनातील शंका दूर करण्याची तयारी असल्याचे त्यांनी म्हटले. बारसू गावात सध्या रिफायनरीच्या ठिकाणी बोअर मारले जात आहेत. महाविकास आघाडीचे सरकार असताना रिफायनरी प्रकल्पासाठी बारसू या जागेसाठी त्यांनी केंद्र सरकारला पत्र लिहिले होते. आता, त्यांची भूमिका विरोधाची असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.
जामनगर रिफायनरी
देशातील सगळ्यात मोठी रिफायनरी सध्या गुजरातमधील जामनगर येथे आहे. जामनगरमधील रिफायनरीमुळे गुजरात राज्याला फायदा झाला आहे. जामनगर रिफायनरीच्या जागेत आंब्यांची झाडे लावण्यात आली आहे. या आंब्यांची निर्यात केली जाते. त्यातून गुजरातचा फायदा होत असल्याचे फडणवीस यांनी म्हटले.