(यवतमाळ)
पोहरा देवीला नवस फेडायला जाणा-या भाविकांवर काळाने घाला घातला. या भीषण अपघातात पाच भाविक जागीच ठार झाले तर ११ जण गंभीर जखमी झाले आहेत. पुसद-दिग्रस मार्गावर हा भीषण अपघात झाला. बेलगव्हान घाटात नाल्याच्या पुलावरुन ऍपे रिक्षा थेट खाली कोसळली. वाहनावरील नियंत्रण हुकल्याने हा भीषण अपघात झाला. हा अपघात दुपारी १२ वाजता झाला. त्यातील जखमी झालेल्या पाच जणांची प्रकृती गंभीर आहे. जखमींमध्ये दोन लहान मुलांचाही समावेश आहे.
मोहा तांडा, गोकी तांडा आणि पांढुर्ना गावातील भाविक पोहरादेवी येथे नवस फेडण्यासाठी जात होते. बेलगव्हान घाटात वाहनचालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. ऑटो पुलावरुन थेट खाली कोसळला. या ऍपे रिक्षामध्ये १५-२० जण असल्याची प्राथमिक माहिती आहे. त्यांना बाहेर पडायला वेळच मिळाला नाही. त्यांच्यावर पुसद ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
हा अपघात झाला तेव्हा ऍपे रिक्षामध्ये १५-२० जण होते. ऑटो पुलावरुन थेट खाली कोसळताच मोठा आवाज झाला. भाविकांच्या किंकाळ्यांचा आवाज ऐकून आजूबाजूचे नागरिक मदतीसाठी धावले. त्यांनी भाविकांना तातडीने मदत करत जखमींना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात दाखल केले.