(देवळे / प्रकाश चाळके)
संगमेश्वर तालुक्यातील देवळे कुंभारवाडी, वरचीवाडी परिसरात गेल्या सहा महिन्यांपासून बिबट्याचा प्रचंड धुमाकुळ सुरू आहे. हा बिबट्या अंधार पडला की डरकाळ्या फोडत वस्तीत फिरत असतो, शनिवारी रात्री दीडच्या सुमारास या बिबट्याने देवळे कुंभारवाडीतील शेतकरी सुधाकर गुरव यांच्या घराच्या पडवीत गाईजवळ बांधलेल्या 6 महिन्याच्या वासरावर हल्ला करून त्याला जखमी केले. वासराच्या ओरडण्याने घरातील माणसे जागी झाली आणि त्यांनी आरडाओरड करून वाघाच्या तावडीतून वासराला सोडवले, पण वाघ घराच्या आसपास गुरगुरत होता व नंतर डरकाळ्या फोडत तीन वाजेपर्यंत कुंभारवाडीच्या आसपासच फिरत होता. सुमारे साडे तीन वाजता वाघ वरच्या वाडीत गेला व तिकडे पुन्हा मोठ्याने डरकाळ्या फोडू लागला.
वाघाच्या हल्ल्यात वासरू गंभीर जखमी झाले असून परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर वाघाच्या बंदोबस्तासाठी वनविभागाकडे देवळे ग्रामपंचायतीने पत्राद्वारे मागणी केलेली आहे. वनविभाग याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचे येथील ग्रामस्थांचे म्हणणे आहे. वाघाच्या बंदोबस्तासाठी अजूनपर्यंत कोणत्याही उपाययोजना केलेल्या नसल्याने संताप व्यक्त कारण्यात येत आहे.
सदर वाघ अधूनमधून दिवसाढवळ्या गावामध्ये फिरताना लोकांना दिसत आहे. चाफवली, मेघी येथून शाळेत येणाजाणारी शाळकरी मुले ही दुर्गम भागातून व जंगलातील वाटेने शाळेत येत असतात,तीही आता शाळेत जायला घाबरत असून सर्वच लहान मोठ्यानी या वाघाचा धसका घेतला आहे.
चाफवली येथिल सिताराम करवंजे याच्यावरही वाघाने हल्ला केला होता, नशीबाने ते त्यातून बचावले. आसपासच्या गावांमध्ये बिबट्याकडून माणसांवर हल्ले होण्याच्या घटना अधूनमधून घडत असतानाही वनविभाग पिंजरा बसवण्यास असमर्थतता दर्शवत आहे. त्यामूळे वनविभागाच्या कारभारावर ग्रामस्थांकडून तीव्र नाराजी व्यक्त होत असून, सदर वाघाकडून मनुष्यहानी होण्याआधी त्याला जेरबंद करावे अशी आग्रही मागणी पुन्हा एकदा देवळे ग्रामस्थांकडून केली जात आहे.