; देव पूजा :
देव पूजा हा आपल्या भक्ती, श्रद्धा, विश्वास यांचा परिपाक आहे. प्रातःकाली स्नानानंतर देवपूजा करावी. सर्व पूजा सामग्री एकत्र करून, देवासमोर बसावे. पाणी भरलेला पाण्याचा तांब्या देवाच्या उजवीकडे ठेवावा. प्रथम कलशातील जलात पवित्र नद्यांचे आवाहन करावे. त्यातील जलाने प्रथम शंखाची पूजा करावी, शंख जलाने भरावा. त्यातील पाण्याने आपले शरीर आणि सामुग्री यावर शंख जल प्रोक्षण करावे. भुशुद्धी, भूतशुद्धी यथायोग्य करून पूजा सुरवात करावी.
पुरुषसूक्ताने देवांच्या मूर्तीवर दोन हात, दोन पाय, गुडघे कंबर, बेंबी, हृदय, कंठ, मुख, नेत्र, मस्तक या स्थानी पुरुष सुक्ताच्या मंत्राने क्रम नसोडता न्यास करावा. मूर्तीला साक्षात देवरूप मानून नंतर पूजा करावी. आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्त्र, यज्ञोपवित, गंध, फुल, धूप, दीप, नैवेद्य, नमस्कार, प्रदक्षिणा व पुष्पांजली हे १६ उपचार पुरुषसूक्ताचे एकेक ऋचेने देवाला द्यावे. गंधा नंतर अलंकार, चांगले भोग वाहावे. नैवेद्याला चार प्रकारचे अन्न द्यावे. श्रेष्ठ उपचार, विडा, दक्षिणा, आरती, फळे, स्तवन, गायन, नाच, वाद्ये, ब्राह्मणभोजन या उपचाराने देवाला संतुष्ट करावे. पूजेच्या आरंभी घंटानाद करावा, स्नान धूप, दीप देताना घंटा वाजवावी. स्नान, नैवेद्य, वस्त्र, यज्ञोपवित समर्पणानंतर आचमन देत जावे. प्रत्येक उपचाराला आचमन देत राहावे. देव पूजेच्यावेळी स्नान घालताना, महा्देवाशिवाय अन्य देवाला शंखाचे पाणी अर्पण करावे.
आपल्या घराच्या बागेतील आणलेली फुले उत्तम, अरण्यातून आणलेली फुले मध्यम, विकत आणलेली फुले कनिष्ठ होत. पांढरी फुले उत्तम, लाल फुले माध्यम, काळीं फुले कनिष्ठ होत. शीळी फुले वर्ज्य करावी. फुलास भोक पडले असेल, बारीक किडे फुलात असतील, आपोआप गाळून पडलेली फुले, मळ लागलेली फुले, डाव्या हाताच्या स्पर्श झालेली, पाण्यात घातलेली फुले, फुलांचे तुकडे देवाला वाहू नये. बकुळ,कमळ, अशोक, चमेली, दुर्वा, बेलपत्र, शमी, कुश, देवाला वाहावे. तुळस, कण्हेर, मोगरा, अशोक हि विष्णूला उत्तम होत. कांचन, आकाव (रुई) धोत्रा, सेमल कुडा हि विष्णूला वाहू नयेत.
गणपतीला तुळशी, देवीला दुर्वा, महादेवाला काळी, लालफुले, केवडा, निंब, आदी वाहू नये. महादेवाला पांढरी फुले, बेलपत्र वाहावी गणपतीला दुर्वा व लाल फुले वाहावी. विष्णूस तुळशी व पीवळी फुले वहावित. दत्तात्रेयानां तुळस बेल व पिवळी व पांढरी फुले वाहावी.
देवघर कसे असावे ? देवघरासंबधित काही महत्वाचे नियम :
◆ देवघरात फरशी बसवायची असेल तर पांढरा किंवा पिवळा मार्बल चालेल.
◆देवघर लाकडाचे किंवा पांढऱ्या मार्बलचे चालेल स्टील किंवा लोखंडाचे नको.
◆ देवघराच्या भिंतींना हल्का नारंगी, केसरिया या भगवा रंग लावावा नाहीतर एखादी भिंत या रंगाची करावी.
◆ देवघरात अभिमंत्रित श्री यंत्र जरूर ठेवावे ठेवताना त्याची स्थती योग्य असणे गरजेचे आहे.
◆ देवघरात देवघर झाडण्यासाठी एक झाडू जरूर ठेवावा कुंचा शक्यतो नको.
◆ देवघरात बसायला दर्भाचे आसन जरुर घ्यावेत कोणत्याही पुजेचा दुकानात दर्भ आसन मिळते.
◆ देवघरात रोज तेलाचा आणि एक तुपाचा दिवा जरूर लावावा.
◆देवघरात रोज एक सुंगधी अगरबत्ती आणि एक लोभान ची उदबत्ती जरूर लावावी.
◆देवघरात एकाच देवतेच्या एकपेक्षा जास्त मूर्ती नसाव्यात.
◆देवांचे आसन नेहमीच आपल्या आसनपेक्षा उंच असावे.
◆देवघरात वरूण कलश ठेवावा हा कलश आपल्या कुलस्वामिनीच्या नावाने स्थापन करावा. कलशात नारळ 5 पाने पाणी पैसा सुपारी टाकावी त्याला हळदी कुंकवाचा प्रत्येकी ३ किंवा ५ रेषा ओढाव्यात.
◆देवघरात गणपती अन्नपूर्णा बाळकृष्ण श्रीयंत्र आणि आपल्या गुरूंची मूर्ती जरूर असावी.
◆ देवघरात जिवंत गुरूंची मूर्ती ठेऊ नये किंवा फोटो पण लावू नये.
◆देवघरात मृत व्यक्तींचे फोटो देवताबरोबर ठेऊ नयेत.
◆देवघरात रोज कपूर जाळून एक तरी मंत्र आगर स्तोत्र जरूर म्हणावे आणि घंटी वाजवावी.
◆देवघरात एक वितापेक्षा जास्त उंच मूर्ती नसावी.
◆ देवघरात झोपणे जेवणे टाळावे.
◆देवघरात देवाला सणावारी आपण जे जेवण करता ते नैवेद्य म्हणून दाखवावे.
◆ देवघरात पूजा करताना भांडणे ओरडणे अपशब्द बोलणे टाळावे.
हे जरूर लक्षात ठेवा!
१) देवासमोर लावलेल्या समईची ज्योत केव्हाही दक्षिणेकडे का असू नये ?
उत्तर- ती यमाची मृत्यू ची दिशा आहे. यमाची पुजा केली जात नाही. फक्त दिवाळीत यम व्दितीयाला यमाचे पुजन केले जाते तेव्हा दक्षिणेला दिवा लावला जातो.
२) स्त्रियांनी केव्हाही तुळस का तोडू नये?
उत्तर- ही सौभाग्य देणारी आहे म्हणून.
३) देव-देवतांना वंदन करताना डोक्यावरील टोपी का काढावी ?
उत्तर- ब्रह्मरंध्राकडे निर्गुण ईश्वरी उर्जा आकृष्ट होते व ती ग्रहण करण्यासाठी टोपी काढावी.
४) शिवपिंडीला अर्धीच प्रदक्षिणा का घालावी.
उत्तर- शिवसुत्र आहे महादेवाचे. रद्रगण, पितृगण,लिंगाच्या टोकाला तीर्थ प्रसादासाठी बसलेले असतात. त्याना प्रदक्षिणा होईल म्हणून.
५) एकाच घरात दोन शिवलिंगे, दोन शाळीग्राम, दोन सुर्यकांत, दोन चक्रांक, तीन देवी, गणपती व दोन शंख पूजेस का पुजू नयेत ?
उत्तर- प्रत्येक गोष्टीत एक तत्व असते. आई बाप दोन होऊ शकत नाही एकच असतात अव्दैताची पुजा करतात, व्दैताची पुजा केली जात नाही म्हणून.
६) गायत्री मंत्र आसनावर बसून जपावा. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत का जपू नये ?
उत्तर- हा मंत्रराज आहे, ज्या मंत्राना बीज असतात, ते मंत्र सोवळ्यातच आसनावर करायचे असतात. कारण चित्ताची एकाग्रता महत्वाची असते. रस्त्यातून जाता येता किंवा गाडीत जपताना ती एकाग्रता साधत नाही व शरीर दोष येतो अंतर्मुखता साधत नाही. त्यामुळे मंत्रजपाचे फल मिळत नाही म्हणून.
७) शाळीग्राम पूजावयाचे ते सम पूजावेत. मात्र समांमध्ये दोन का पुजू नयेत ?
उत्तर- शाळीग्राम हा स्वयंभू आहे. हे विष्णूचे प्रतिक आहे व दोन पुजले तर कर्त्याला उद्वेग, कलह प्राप्त होतो म्हणून.
८) निरंजनात तुप व तेल कधीही एकत्र का घालू नये ?
उत्तर: तूप हे सत्व तत्व व निर्गुण आहे व तेल हे रज तत्व व सगुण आहे . म्हणून हे दोन्ही एकत्र करता येत नाही . नाहीतर तम तत्व वाढेल . राक्षसी संकटे येतील म्हणून.
९) देवदेवतांच्या मूर्तीची वा फोटोची तोंडे कधीही दक्षिणेकडे किंवा एकमेकांसमोर का करू नयेत ?
उत्तर- त्यांच्या तेजाच्या लहरी स्पंदने समोर फेकली जातात त्यामुळे शत्रुत्वाचा दोष येतो म्हणून.
१०) विष्णूच्या मस्तकावर वाहिलेले फुल मनुष्याने आपल्या मस्तकावर का ठेवू नये ?
उत्तर- फुले ही देवतांची पवित्रके आहेत. विष्णुतत्त्व व चैतन्य त्या फुलात येते ते शक्तीस्वरुप होते ही शक्ती आपणास सहन होत नाही म्हणून.
११) शिव मंदिरात झांज, सूर्य मंदिरात शंख व देवी मंदिरात बासरी का वाजवू नये ?
उत्तर- शिवाचा तमभाव आहे व झांजेतुन तमतत्वाचे स्वर उत्पन्न होतात त्यामुळे शिवास विरक्ती येते म्हणून.
सुर्य हा अग्नी तत्त्वाचा आहे व शंखनादही अग्नीतत्वाचा आहे दोन्हीही शक्ति एकरूप झाल्यावर रज कणाचे घर्षण होते. सुक्ष्म ज्वाळाची निर्मिती होते व त्यामुळे दाह निर्माण होतो म्हणुन. देवी मंदिरात बासरी ही नाद पोकळी निर्माण करतो. शक्तीतत्व ह्या नादात पोकळीत रहात नाही. ती हिरण्यगर्भा आहे. ती प्रसूति वैराग्य आहे.
१२) आपली जपमाळ व आसन कधीही दुस-यास वापरण्यास का देवू नये ?
उत्तर- त्यात आपल्या सेवेच्या सात्विक लहरीचे बंधन झालेले असते . ते दुस-यास दिल्यास त्याला ते मिळते व साधनेत त्या आसनावर आळस येतो.
१३) देवाला नेहमी करंगळी शेजारील बोटाने गंध का लावावे.
उत्तर- हाताची पाची बोटे ही त्या त्या तत्वाशी निगडीत आहेत. अंगठा -आत्मा, तर्जनी -पितर, मध्यमा-स्वतः, अनामिका -देव, करंगळी -ऋषी. म्हणून देव बोटानेच देवाला गंध लावावे.
१४) समईत नेहमी १, ३, ५, ७ अशा विषम वाती का असाव्यात सम का असू नयेत.
उत्तर- विषम तत्व हे तम आहे त्यामुळे आपल्याकडे येणारे तम ते विषम उसळते व सात्विक लहरी प्रस्थापित करते म्हणून.
१५) एका हाताने देवाला नमस्कार का करू नये.
उत्तर- दश इन्द्रियाचा नमस्कार मह्त्वाचा असतो. पंचतत्त्वाचा नाही.