(देवरुख / वार्ताहर)
संगमेश्वर तालुक्यातील देवधामापूर गावामध्ये तीन महिन्यापूर्वी तयार केलेला नवीन रस्ता पूर्णपणे उखडून गेला आहे. सदर ठेकेदारावर कारवाई करून रस्ता मजबुतीकरण व्हावा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे. मागणीचा विचार न झाल्यास स्वातंत्र्यदिनी तहसीलदार कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा निवेदनाद्वारे दिला आहे. हे निवेदन ग्रामस्थांनी तहसीलदार अमृता साबळे यांच्याकडे सुपूर्द केले आहे.
निवेदनात भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजीक विकास योजनेतून २०२१-२२ या योजनेतून धामापूर तर्फे देवरुख बौद्धवाडी मुख्य रस्ता ते स्मशानभूमी मजबूती करण डांबरीकरण करणे असा रस्ता तयार करण्यात आला. अंदाजे १५ लाख एवढी रक्कम खर्च करून तीन महिन्या पूर्वी रस्त्याचे काम केले गेले. सदर काम अंदाजपत्रका प्रमाणे होत नसल्याने व कामाचा दर्जा नसल्याचे लक्षात आल्याने ठेकेदारास काम थांबवावे असे सांगितले.
यानूसार ठेकेदाराने काम थांबवण्याचे मान्य केले परंतु दुसऱ्याच दिवशी काम सुरू करून ते पूर्ण केले. सदरचा रस्ता सध्या पूर्ण उखडला आहे. सदरचा रस्ता अंत्यविधी साठी तेलेवाडी, पाष्टे वाडी, सप्रेवाडी व बौध्दवाडी या चार वाड्या वापर करतात. सदरचा रस्ता नादुरुस्त झाला तर चार वाडयाना अंत्यविधीसाठी जाणे फार गैरसोईचे होत आहे.
ग्रामपंचायत उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने नाईलाजास्तव हा उपोषणाचा मार्ग अवलंबावा लागला असल्याचे निवेदनात नमूद केले आहे. या निवेदनावर गणपत पाष्टे, संतोष पाल्ये, विनोद घाग, सुनिल रहाटे यांसह ग्रामस्थांनी स्वाक्षरी केली आहे.