सुधागड तालुक्यातील खुरावले येथील मुकुंद जाधव यांच्या घरामध्ये रविवारी दुर्मिळ प्रजातीचा साधारणपणे साडेचार फूट लांब फोर्स्टेन मांजऱ्या साप (Forstein cat snake) आला होता. या सापाला येथील सर्पमित्र संदीप जाधव यांनी मोठ्या शिताफीने पकडला आणि सर्पमित्र अमित निंबाळकर व वनविभागाच्या मदतीने सुखरूप अधिवासात सोडून दिले.
हा साप पूर्ण वाढ झालेला सदृढ होता. शिवाय त्याने उंदीर खाल्ला होता. उंदराच्या शोधत तो घरात शिरलेला असू शकतो, अशी माहिती सर्पमित्र अमित निंबाळकर दिली आहे. मांजऱ्या सापाला Common Cat Snake असे देखील म्हटलं जातं. फिकट राखाडी तसेच काहीसे पिवळे रंग असणाऱ्या या मांजऱ्याच्या शरीरावर गडद तपकिरी किंवा काळी नागमोडी नक्षी असते. डोक्यावर तपकीरी किंवा काळे लहान लहान ठिपके, डोळ्याच्या मागून जबड्यापर्यंत काळी तिरकस रेष, पोट पांढरे त्यावर छोटे छोटे काळे ठिपके, मानेपेक्षा डोके मोठे, मोठे डोळे, लांबट शेपूट असते.
मांजऱ्याचा अधिवास शक्यतो बांबूचे बेट, घनदाट जंगले आणि दाट झाडी असणाऱ्या ठिकाणी असतो. अत्यंत दुर्मिळ, निशाचर, दिवसा बांबुचे बेट, झाडाच्या ढोलीत किंवा दगडाखाली बहुतांश वेळा रात्रीच आढळतो. या सापाला डिवचलं तर शरीराचे वेटोळे करुन हल्ला करतो. त्याचबरोबर शेपटीचे टोक उंच उभे करुन जोरजोरात हलवतो. या सापाचे विषारी दात जबड्यातील मागे असतात. हा साप निमविषारी आहे.