(नवी मुंबई)
आप्पासाहेब धर्माधिकारी यांचा आज केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते महाराष्ट्र भूषण पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. यावेळी त्यांच्यासोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस देखील उपस्थित होते. रायगड जिल्ह्यातील खारघरमधील ३०६ एकरावर पसरलेल्या भव्य मैदानावर या पुरस्कार सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं.
या पुरस्कार सोहळ्यासाठी राज्यभरातून अप्पासाहेब धर्माधिकारी यांचे अनुयायी आले होते, मात्र या पुरस्कार सोहळ्याला गालबोट लागलं आहे. उष्माघातामुळे ११ जणांचा मृत्यू झाल्याचा तसेच अनेक भाविक अत्यवस्थ आहेत. काँग्रेसचे प्रवक्ते अतुल लोंढे यांनी ट्विट करत सरकारवर टीका केली आहे. एप्रिल महिन्याच्या कडक उन्हात दुपारच्या वेळी सभा घेतल्यामुळे लोकांना त्रास झाला. कार्यक्रमातच अनेक जण चक्कर येऊन खाली पडले, तर अनेक जणांना उलटीही झाली.
भर दुपारी ४२ अंश तापमानात आयोजित केलेल्या या सोहळ्यात उष्माघातामुळे जवळजवळ 300 लोकांना त्रास झाला. त्यापैकी ५० लोकांना रुग्णालयात दाखल करावे लागले. त्यातील ११ जणांचा मृत्यू झाला. मृतांच्या कुटुंबियांना सरकारकडून ५ लाखांची मदत जाहीर करण्यात आली. आणखी १५ जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येते. खारगघरमधील टाटा रुग्णालय, पनवेलमधील उपजिल्हा रुग्णालय तसंच मेडी कव्हर रुग्णालयात अनेक जणांवर उपचार सुरू आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अजूनपर्यंत मृतांबाबत प्रशासनाकडून अधिकृत माहिती व आकडा समोर आलेला नाही.
आज सरकारच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराच्या कार्यक्रमादरम्यान भर दुपारी एप्रिल महिन्यात उन्हामध्ये कार्यक्रम ठेवल्यामुळे या सरकारच्या निष्काळजीपणामुळे निष्पाप दहा लोकांचा मृत्यू झालाय अनेक लोक गंभीर आहेत हा सरकारने केलेला मनुष्यवध आहे
यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल…— Atul Londhe Patil (INDIA Ka Parivar)🇮🇳 (@atullondhe) April 16, 2023
सरकारच्या निष्काळजीपणामुळे या लोकांचा बळी गेल्याचा आरोप अतुल लोंढे पाटील यांनी केला आहे. सरकारने केलेला मनुष्यवध आहे. यासाठी सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे. तर काही लोकं मृत्यूचं राजकारण करतायत हे फार दुर्देवी असल्याचे सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे.
दरम्यान या घटनेची माहिती समजताच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी तातडीने रात्री एमजीएम रुग्णालयात धाव घेतली आणि डॉक्टरांशी चर्चा केली. त्यांच्याकडून सर्व माहिती घेतली. उष्माघात झालेल्या सर्वांवर उच्च प्रतीचे उपचार करण्याचे आदेश दिले. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी सांगितले की, ही अत्यंत वेदनादायी दु:खद घटना आहे. उपचार घेणार्या श्री सेवकांच्या सहाय्यासाठी नवी मुंबई महापालिकेच्या एका उपायुक्ताची नियुक्ती करण्यात आली आहे.