(रत्नागिरी)
जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षकांच्या बदल्यांची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी अवघड (दुर्गम) क्षेत्रातील शाळांच्या यादीचा उपयोग करावा असे आदेश नुकत्याच झालेल्या ग्रामविकास विभागाच्या व्हिडीओ कॉन्फरन्समध्ये वरीष्ठ अधिकार्यांनी दिले आहेत. नव्याने केल्या जात असलेल्या यादीचा उपयोग पुढील वर्षी करण्यात येणार आहे. त्यामुळे सध्या दुर्गम भागात काम करणार्या शिक्षकांचा सुगम शाळांमध्ये येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
ग्रामविकास विभागाच्या आदेशानुसार बदली पात्र शिक्षकांची यादी, संवर्ग एक, संवर्ग दोन पात्र शिक्षकांची यादी करण्यात आलेली तयार करण्यात आहे. तसेच निव्वळ रिक्त पदांची यादी, संभाव्य रिक्त पदांची यादी व जिल्ह्यातील अवघड क्षेत्र घोषित करणे यासंबंधीची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले होते. शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी शिक्षकांना मोबाईल वरती सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार असून नव्या शासन निर्णयानुसार प्रथमच बदली प्रक्रिया होत असल्याने शिक्षकांमध्ये उत्सुकता लागली होती. प्रकिया सुरु असतानाच बदली प्रक्रियेविषयी शुक्रवारी (ता. ८) राज्यातील सर्व शिक्षणाधिकार्यांशी अतिरिक्त मुख्य सचिवांनी संवाद साधला.
यंदाच्या शिक्षकांच्या बदली प्रक्रियेसाठी मागील वर्षीच्या अवघड क्षेत्रातील शाळांच्या यादीनूसार करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे गेल्या दोन महिन्यांपासून धडपड करून अवघड क्षेत्रातील शाळांची यादी करणार्यांच्या मेहनतीवर पाणी फिरले आहे. आधी अवघड क्षेत्रातील शाळा निश्चित करण्यासाठी प्रशासनावर मोठा दबाव असतांना आता ग्रामविकास विभागाच्या नव्याने आदेशामुळे प्रशासनावरील ताण कमी होणार आहे. सुगम, दुर्गम शाळांची यादी अत्यंत महत्त्वाची असल्यामुळे त्यादृष्टीने गेले सहा महिने काम सुरु होते. दुर्गम भागातील शाळांच्या निकषांची माहिती त्या-त्या विभागाकडून गोळा करण्याचे कामही अंतिम टप्प्यात आले होते.
शिक्षण विभागाने शिक्षकांच्या बदलीची तयारी सुरू केली असून कोरोनाच्या दोन वर्षाच्या कालावधीत शिक्षकांच्या बदल्या झालेल्या नव्हत्या. त्यामुळे अनेक शिक्षकांची अडचण झाली आहे. पुढील आठवड्यात शिक्षकांच्याबदलीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता असून यामुळे संवर्गनिहाय शिक्षक बदलीसाठी सर्व शक्यता पडताळून पाहत आहेत. प्रशासनाने यापूर्वीच शाळा आणि शिक्षकनिहाय डास बेस तयार केलेला असून ही माहिती लवकरच ग्रामविकास विभागाला सादर करण्यात येणार आहे.
दुर्गम भागातील शाळांची यादी बनविण्याचे काम अंतिम टप्प्यात आले आहे. सध्या जिल्ह्यात सुमारे ६१६ शाळा दुर्गम भागात आहेत. पाळीव प्राण्यांवर बिबटयांचा हल्ला झालेल्या शाळांचा समावेश यादीत केला जाणार आहे. मात्र ही अट घातली तर ७० टक्के शाळा दुर्गम होतील. त्यामुळे हा निकष काढून टाकण्यात आल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.