(नवी दिल्ली)
दुबईतील एका निवासी इमारतीला लागलेल्या आगीत ४ भारतीयांसह १६ जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच या आगीमुळे ९ जण जखमी झाले आहेत. वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, दुबईच्या अल रास भागातील एका निवासी इमारतीत शनिवारी पहाटे १२.३० वाजता आग लागली. इमारतीच्या चौथ्या मजल्यावर आग लागली आणि इमारतीच्या इतर भागात ही आग पसरत गेली.
मृतांमध्ये चार भारतीयांचा समावेश आहे. ज्यामध्ये केरळचे जोडपे आणि अन्य दोघे तामिळनाडूचे आहेत. या अपघातात पाकिस्तानातील तीन चुलत भाऊ आणि नायजेरियन महिलेचाही मृत्यू झाला.
आगीची माहिती मिळताच दुबई सिव्हिल डिफेन्सच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला आसपासच्या इमारतींमधून लोकांना बाहेर काढण्यात आले. आगीची माहिती मिळताच पोर्ट सैद अग्निशमन केंद्र आणि हमरिया अग्निशमन केंद्राचे जवानही घटनास्थळी दाखल झाले. पहाटे अडीचच्या सुमारास आग आटोक्यात आणण्यात आली.