(रत्नागिरी)
बेदरकारपणे टाटा सुमो गाडी चालवून दुचाकीला धडक देत पाठीमागे बसलेल्या महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी चालकाविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अपघाताची ही घटना शुक्रवार १५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ४.३० वा. सुमारास रत्नागिरी ते हातखंबा जाणाऱ्या रस्त्यावरील मुकादम हॉस्पिटलकडे जाणाऱ्या फाट्यावर घडली होती.
प्रवीण कीर असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या सुमो चालकाचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी प्रवीण आपल्या ताब्यातील टाटा सुमो (एमएच- ०६- एबी – ७४८५) गाडीची नोंदणीची मुदत संपलेली असतानाही रत्नागिरी ते हातखंबा अशी वेगाने घेऊन जात होता. तो मुकादम हॉस्पिटलकडे जाणाऱ्या रस्त्यावर आला असता कोणताही इशारा न देता त्याने अचानकपणे गाडी वळवली. त्यामुळे त्याचा गाडीची धडक माधव नामजोशी यांच्या दुचाकीला बसून अपघात झाला होता. या अपघाताप्रकरणी महिलेच्या मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी सुमो चालक कीर यांच्यावर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.