( रत्नागिरी )
लगतच्या मिरजोळे एमआयडीसी येथे निष्काळजीपणे वाहन चालवून दुचाकीच्या शोरूमला धडक देणाऱ्याला न्यायालयाने ६ महिने सश्रम कारावास व ६ हजार रूपयांचा दंड ठोठावला. प्रशांत चव्हाण (२६, रा. एमआयडीसी रत्नागिरी) असे आरोपीचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध ग्रामीण पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते.
रत्नागिरी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी माणिकराव सातव यांनी या खटल्याचा निकाल दिला. सरकार पक्षाच्यावतीने अॅड. प्रज्ञा तिवरेकर यांनी काम पाहिले. खटल्यातील माहितीनुसार, ६ फेब्रुवारीला २०२२ रोजी दुपारी २च्या सुमारास आर. के. मोटर्स टिव्हीएस शोरुम एमआयडीसी मिरजोळे येथे घडली होती. प्रशांत चव्हाण हा वाहन (क्र. एमएच-४६ एबी ०१०७) हे आर. के. मोटर्स टिव्हीएस शोरुम प्लॉट नं ४२ एमआयडीसी – मिरजोळे येथे लागलेली आग आटोक्यात आणून परत वाहन घेऊन रस्त्यावरुन जात होता. त्यावेळी रस्त्याची विशिष्ट परिस्थिती लक्षात न घेता गाडीच्या उजव्या बाजूच्या मागील दरवाजाचे – झडप उघडे ठेवून गाडी निष्काळजीपणे चालवत होता. या गाडीच्या दरवाजाची उघड्या झडपाची शोरुम – गोडावूनच्या भिंतीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की, शोरुमच्या भिंतीचे चिरे व सिमेंटचे ब्लॉक गोडावूनमध्ये असलेल्या नवीन टीव्हीएस कंपनीच्या गाड्यावर पडले. यात ९ गाड्यांचे नुकसान झाले, असा आरोप चव्हाण याच्यावर ठेवला होता. या A प्रकरणी अमित चंदुलाल पटेल (३२, रा. भवानीनगर, खेडशीनाका – रत्नागिरी) यांनी ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती.. पोलिसांनी संशयित चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला होता. तपास सहायक पोलीस फौजदार महेश टेमकर करत होते. तपासात पोलिसांनी संशयितास अटक करुन दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. या खटल्यात पैरवी अधिकारी म्हणून सहा. पोलीस निरीक्षक दिनकर सूर्य व महिला पो. हवालदार संजीवनी मोरे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील आयरे यांनी काम पाहिले.