(राजापूर)
राजापूर शहरातील तालीमखाना गुरववाडी येथील अक्षय अशोक गुरव (२८) या तरूणाचा हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने अलिबाग ते राजापूर प्रवासादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला.
अक्षय हा अलिबाग येथील शासकीय सेवेत होता. गुरूवारी रात्री तो अलिबाग येथुन वडखळ येथे आला व तेथुन आपल्या मित्राच्या टेम्पोतून राजापूरकडे येत होता. खेड ते चिपळूण दरम्यान आला असताना त्याला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्याच्या सोबत असलेल्या त्याच्या दोन्ही मित्रांनी तात्काळ त्याला उपचारासाठी कामथे येथील शासकीय रूग्णालयात दाखल केले. मात्र तेथे हृदयविकाराचा तीव्र झटक्याने त्याचा मृत्यू झाला.
याबाबत त्याच्या नातेवाईकांना माहिती मिळताच राजापूरातून माजी नगरसेवक विनय गुरव, विजय गुरव यांसह सहकाऱ्यांनी चिपळूण कामथे येथे धाव घेतली. अक्षय हा एक हरहुन्नरी युवक होता. वाडीतील सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यात त्याचा कायमच सक्रीय सहभाग असे. त्याचा राजापूर व अलिबाग येथे त्याचा मोठा मित्रपरिवार आहे. त्याच्या पश्चात आई, भाऊ, बहिण असा परिवार आहे. त्याच्या अकाली मृत्यूने तालुक्यात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.