(मंडणगड)
विन्हे येथील दिव्यांग रुपेश वामन पवार यांनी प्रशासनास दिलेल्या आमरण उपोषणास पाठींबा असल्याचे तसेच ०३ डिसेंबर २०२३ रोजी जागतिक दिव्यांग दिनी त्यांच्या उपोषणामध्ये सहभागी होत असल्याचेबाबत निवेदन रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया तालुका शाखा मंडणगड यांच्यावतीने तहसिल कार्यालय मंडणगड येथे 29 नोव्हेंबर रोजी सादर करण्यात आले. यावेळी कार्यकर्त्यांनी तहसिलदार तानाजी शेजाळ यांच्याशी या विषयावर चर्चाही केली.
मंडणगड तहसिल कार्यालयाचे माध्यमातून जिल्हाधीकारी रत्नागिरी यांच्याकरिता सादर करण्यात आलेल्या निवेदनातील माहीतीनुसार दिव्यांग व्यक्तींना सन्मानाने जगता यावे व समान संधी मिळवून देणे करिता शासनाने विविध योजना निर्माण केल्या आहेत. शासनाच्या या धोरणानुसार श्री रुपेश वामन पवार दिव्यांग व्यक्ती म्हणून आपणाकडे सी.एस.सी केंद्र व झेरॉक्स सेंटर चालविण्याकरिता मंडणगड तहसील कार्यालय आवारामध्ये किंवा परिसरामध्ये जागा उपलब्ध करून देणे करिता अर्ज सादर केला असून सातत्याने पाठपुरावा करून सुद्धा त्यांना अद्याप जागा उपलब्ध करून देण्यात आलेली नाही, आणि ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची असून शारीरिक दृष्ट्या दिव्यांग व्यक्तींच्या सहनशीलतेची चेष्टा करणारी व अन्याय करणारी असून त्यांचे हक्क आणि अधिकारांपासून त्यांना वंचित ठेवण्यास कारणीभूत आहे. असे आमचे मत झाले आहे. म्हणून आम्ही श्री रुपेश वामन पवार यांना त्यांचे हक्क आणि अधिकार मिळावा म्हणून केलेल्या मागणीनुसार त्यांनी छेडलेल्या आंदोलनास जाहीर पाठिंबा देत असून दिनांक ३ डिसेंबर २०२३ रोजी जागतिक अपंग दिनी मंडणगड तहसील कार्यालयाच्या समोर करत असलेल्या उपोषणामध्ये सहभागी होत असल्याचे कळविण्यात आले आहे.
निवेदनाचा गंभीरपणे विचार व्हावा व त्यांना न्याय मिळवून द्यावा अन्यथा त्यांना न्याय मिळेपर्यंत आम्ही बेमुदत उपोषणास बसणार असून उपोषणाच्या दरम्यान उपोषणकर्त्यांमधील कोणाच्याही जीवितस धोका निर्माण झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी प्रशासनाची राहील याची गंभीरपणे नोंद घेण्यात यावी असे कळविण्यात आले आहे. निवेदनावर माजी अध्यश्क्ष राजेश गमरे, तालुका अध्यक्ष राजेश साळवी, युवा कार्यकर्ता राजेश खैरे, दिनेश राऊत, प्रतिक गमरे यांच्या सह्या आहेत निवेदनाची प्रत सर्व संबंधीतांना पोहच करण्यात आली आहे.