(रत्नागिरी)
दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी (क्रीडा, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक) या संस्थेच्या वतीने रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग क्रिकेट खेळाडू यांच्याकरीता आंतरराष्ट्रीय खेळाडू व प्रशिक्षक प्रशांत सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली खेड येथील क्रीडा संकुल मैदानात एक दिवशीय लेदर बॉल क्रिकेट शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिरा करीता खेड, दापोली, गुहागर, संगमेश्वर, धामापूर, रत्नागिरी या तालुक्यातील दिव्यांग खेळाडूंनी सहभाग नोंदविला. विशेष म्हणजे पहिल्यांदाच या शिबिरासाठी दिव्यांग महिला खेळाडू यां देखील सहभागी झाल्या होत्या. उपस्थितीत खेळाडूंन मधून आगामी होणाऱ्या कोकण चषक २०२४ या दिव्यांग खेळाडूंच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धेसाठी दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या जिल्हा संघासाठी संघ निवड करण्यात आली आहे.
गेली अनेक वर्षे संस्थेच्या माध्यमातून वेगवेगळ्या क्रीडा स्पर्धांचे आयोजन करून दिव्यांग खेळाडू घडविले जात आहेत आणि त्या खेळाडूंना राज्य राष्ट्रीय स्पर्धामधून खेळण्यासाठी संधी उपलब्ध करून दिली जाते. दिव्यांग व्यक्तींनी फक्त शासनाच्या विविध योजना घेण्यापुरते दिव्यांग राहू नका, घरामध्ये बसून रहाण्यापेक्षा प्रत्येक खेळामध्ये सहभागी होऊन आपल्यामध्ये असणारी जिद्द व कर्तृत्व दाखवणे गरजेचे आहे, यासाठी प्रयत्न असतो. यासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग व्यक्तीसांठी कार्य करणाऱ्या व्यक्ती, संघटना इतर सामाजिक संघटना, दानशूर व्यक्ती, राजकीय व्यक्ती यांनी देखील सदर संस्थेच्या माध्यमातून राबवित असलेल्या विविध उपक्रमांना सहकार्य करणे गरजेचे आहे. तरच रत्नागिरी जिल्ह्यातील दिव्यांग खेळाडू पॅरा ऑलम्पिक सारख्या जागतिक क्रीडा स्पर्धांमध्ये सहभागी होतील असे मत प्रशांत सावंत यांनी खेळाडूंना मार्गदर्शन करतांना व्यक्त केले.
दिव्यांग खेळाडू क्रीडा शिबिर निवड चाचणी यशस्वी करण्यासाठी जनार्धन पवार, राजेश धारीया, मंगेश चांदणे, पांडुरंग नाचरे, राज सावंत, प्रज्ञा जंगम यांनी विशेष सहकार्य केले. निवड चाचणी शिबिरात सहभाग झालेल्या खेळाडूंना दिव्यांग युवा क्रीडा प्रतिष्ठान रत्नागिरी या संस्थेचे पदाधिकारी कौस्तुभ बुटाला, रेणुका गोरीवले, पल्लवी सावंत, प्रज्ञा जंगम, यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.