(मुंबई)
दिवाळी सुटीच्या पार्श्वभूमीवर गावी जाणा-या प्रवाशांची संख्या अधिक असल्याने स्थानकांवर येणा-या प्रवाशाची संभाव्य गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने फलाटाच्या तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबईत फलाटाच्या तिकिटात तब्बल पाच पट वाढ झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना विनाकारण भुर्दंड सहन करावा लागत आहे.
ऐन दिवाळीत फलाटाच्या तिकिटात मोठी वाढ केल्याने आता प्रवाशांना फलाटाच्या तिकिटासाठी ५० रुपये मोजावे लागणार आहेत. ही दरवाढ आजपासून (दि. २२) ३१ ऑक्टोबरपर्यंत म्हणजेच जवळपास १० दिवसांसाठी केली आहे. त्यामुळे मुंबईतील सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांत फलाटाच्या तिकिटाची किंमत १० रुपयांऐवजी ५० रुपये इतकी असणार आहे. त्यामुळे आता दिवाळीच्या काळात प्रवास करणा-या प्रवाशांना जर प्लॅटफॉर्मवर जायचे असतील, तर १० दिवस पाच पट रक्कम मोजावी लागणार आहे.