( रत्नागिरी )
रत्नागिरी शहरातील शिवाजीनगर येथे दुचाकीस्वाराने दारूच्या नशेत दोन कारला धडक देत अपघातात कारणीभूत ठरल्याप्रकरणी एकाला शिक्षा सुनावण्यात आली आहे. दिपक आनंद जाधव ( ४४, रा. मांडवी, रत्नागिरी ) असे आरोपीचे नाव आहे. न्यायालयाने त्याला आज बुधवार 18 जानेवारी रोजी ३ हजार ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा सुनावली. ही घटना २९ डिसेंबर २०२२ सकाळच्या सुमारास शिवाजी नगर रस्त्यावर घडली होती.
सविस्तर वृत्त असे की, आरोपी दिपक जाधव हा मद्य सेवन करुन दुचाकी ( एमएच -०८ एजी २१८३ ) घेऊन साळवी स्टॉप ते माळनाका असा जात होता. शिवाजीनगर बस स्टॉप येथे तो आला असताना दुचाकी निष्काळजीपणे चालवून पुढे जाणाऱ्या मोटार ( एमएच -०८ आर ०१८५ ) ला पाठीमागून ठोकर दिली. त्यामुळे ती मोटार रस्त्याच्या पलिकडे थांबलेल्या मोटार ( एमएच -०८ एजी ०३६० ) वर आदळून अपघात झाला. यामध्ये दोघे मोटार चालक किरण शांताराम शिंदे व निखील सुनिल सावंत यांना दुखापत झाली तर तिनही वाहनांचे नुकसान झाले. या प्रकरणी किरण शिंदे यांनी शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. तक्रारीवरुन पोलिसांनी संशयित दुचाकीस्वाराविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
तपासात पोलिसांनी आरोपीविरुद्ध दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केले होते. आज बुधवारी या खटल्याचा निकाल न्यायालयात झाला. आरोपीने गुन्हा कबुल केल्याने न्यायालयाने आरोपीला ३ हजार ५०० रुपयांच्या दंडाची शिक्षा ठोठावली आहे.