(खेड / भरत निकम)
तिसंगी कुळवंंडी येथील दारुधंद्यांवर पोलीसांनी धाडी टाकल्यानंतर खेडचे दारुबंदी खात्याचे अधिकारी दारुधंदेवाल्यांना भेटून चक्क हातभट्टीची दारु पुन्हा चालू करण्यासाठी गळ घालत असल्याचे बोलले जात आहे. या प्रकरणी उत्पादन शुल्क खात्याच्या रत्नागिरी येथील अधिकारी यांनी चौकशी करुन कारवाई करावी, अशी मागणी कुळवंडी व तिसंगी येथील नागरिकांनी केली आहे.
खेड तालुक्यातील कुळवंडी देऊळवाडी येथील दारुधंद्यांवर उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र मुनगेकर यांनी कारवाई केली होती. चार जणांना ताब्यात घेत त्यांच्याकडून ६ लाख ६० हजार ८७० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला होता. त्यानंतर हे धंदे पुन्हा सुरु करण्यात आले होते. पोलीसांनी गुन्हा नोंद करुन कारवाई केली. त्यानंतर उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी यांनी या दोन्ही गावात जाऊन परत कारवाई करणे गरजेचे होते. मात्र, खेड येथील उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी यांनी शासकीय वाहनाने तिसंगी व कुळवंडी येथील दारुधंदेवाल्यांची भेट घेऊन त्यांचे नुकसान झाले म्हणून सांत्वन केले असल्याची चर्चा आहे.
कुळवंडी आणि तिसंगी हे गावठी दारुचे माहेरघर समजले जाते. रात्रीच्या अंधारात या हातभट्टीची दारु गाळली जाऊन संपूर्ण उत्तर रत्नागिरी जिल्ह्यातील गावोगावी दारुचे कॅन आलिशान गाड्यांमधून पोच होत असतात. जिल्ह्यातील पोलीस अधिकारी हे दिवसा कारवाई करतात. मात्र, रात्रीच्या अंधारात दारुवाले दारु गाळून पहाटेच्या वेळी गावोगावी जाऊन पोहच होते. या दोन्ही गावांतील दारुचे धंदे बंद करण्याचे आव्हान जिल्ह्यातील पोलीस प्रशासनाला दिले गेले आहे. हे धंदे बंद करण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क खात्याचे अधिकारी यांचे असताना काही अधिकारी फक्त देशी दारुची दुकाने, बियर बार आणि परमिट रुमच्या आत बसून तेथील शासनमान्य दारुच्या बाटल्या मोजून ते अहवाल देण्याचे काम नियमित करतात.
दारुधंदेवाल्यांचे सांत्वन नेमका प्रकार काय? असा प्रश्न येथील नागरिक विचारत आहेत. पोलीस अधिकारी यांच्या कारवाईनंतर दारुबंदी विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेल्या सांत्वन कार्यक्रमात पुन्हा हातभट्टीची ताकद वाढविण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी ही भेट घेतली की काय? असा प्रश्न विचारला जात असून या संपूर्ण प्रकरणाची जिल्ह्यातील उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी चौकशी सुरु करावी, अशी मागणी या विभागातून करण्यात आली आहे.