(दापोली)
अतिवृष्टीमुळे व वेगवान वाऱ्याने दामू पवार या आदिवासी बांधवाचे घराचे छप्पर उडाले, घराच्या मातीच्या भिंती कोसळल्या. राहायला घर नसल्यामुळे हे कुटुंब कादवण येथील एका पडलेल्या एसटीच्या निवारा शेडमध्ये राहत असल्याची माहिती मिळताच बिरसा फायटर्सचे राष्ट्रीय अध्यक्ष सुशिलकुमार पावरा, जिल्हाध्यक्ष राजेंद्र पाडवी, तालुकाध्यक्ष गुलाबराव अहिरे, सदस्य अरुण वळवी हे बिरसा फायटर्स आदिवासी कार्यकर्ते कादवण येथील बेघर आदिवासी कातकरी कुटुंबाच्या मदतीला धावून गेले. बिरसा फायटर्स व आदिवासी कर्मचारी परिवार रत्नागिरी यांच्याकडून तातडीने आर्थिक व वस्तूरूप मदत तातडीने जमा करून ती या बेघर झालेल्या आदिवासी कुटुंबाला मदत करण्यात आली. यामध्ये ३ महिने पुरेल एवढे किराणा सामान, धान्य, कपडे भांडी आदी वस्तुरूप मदत करण्यात आली.
यावेळी कादवण गावाचे पोलिस पाटील, ग्रामस्थ व कादवण गावातील आदिवासी बांधव उपस्थित होते. दामू पवार या कुटुंब प्रमुखाचेच आधार कार्डवरील नाव चुकले असल्यामुळे या कुटुंबांला शासनाच्या कोणत्याच योजनांचा लाभ मिळत नाही, अशी धक्कादायक बाबही समोर आली. या कुटुंबाची गावातील एका वाड्यात तात्पुरती राहण्याची सोय आम्ही करणार आहोत, असे पोलिस पाटील यांनी सांगितले. सामाजिक बांधिलकी म्हणून बिरसा फायटर्स कर्मचाऱ्यांनी केलेल्या मदतीबद्दल या कुटुंबाने त्यांचे आभार मानले आहेत.