( दापोली / प्रतिनिधी )
दापोली येथे समुद्रात रविवारी ६ जण बुडाल्याची घटना घडली होती. यातील ५ जणांना वाचवण्यात स्थानिकांना यश आले होते तर एकजण बेपत्ता झाला होता. 16 तासानंतर त्याचा मृतदेह आता आढळून आला आहे. सौरभ धावडे (18, रा. महाबळेश्वर) असे मृत तरुणाचे नाव आहे.
रविवार सुट्टी असल्याने दापोली तालुक्यातील कर्दे येथील समुद्राचा आनंद घेण्यासाठी वाई सातारा येथील 6 तरुण आपल्या दुचाकीवरून आले होते. कार्तिक घाडगे (20), यश घाडगे (19), दिनेश चव्हाण (20), अक्षय शेलार (19), कुणाल घाडगे (30), आणि सौरभ धावडे (18, सर्व रा. वाई सातारा) असे ६ जण आले होते.
ते दुचाकी घेऊन कर्दे येथील समुद्रावर गेले. दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास त्यांनी किनाऱ्यावर गाड्या लावून ठेवल्या. बॅग व इतर साहित्य ठेवण्यासाठी त्यांनी किनाऱ्यावर एक तंबू उभारला. यामध्ये सर्व साहित्य ठेवले. आणि त्यानंतर ते पाण्यात उतरले. अंघोळ करत असताना 6 ही जणांच्या पायाखालची वाळू सरकली आणि ते समुद्रात ओढले गेले. आपण आता बुडणार हे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांनी लगेच आरडाओरडा करायला सुरुवात केली. किनाऱ्यावर बाजूला असलेल्या एका हॉटेल मधील दोन तरुणांनी दोरी घेऊन त्या दिशेनं धाव घेतली. त्यांनी समुद्रात दोरी टाकली. या दोरीला एकमेकांनी धरले. हळूहळू बाहेर येत होते. पाच जणांना बाहेर काढले मात्र सौरभ याचा हात सुटला आणि तो मोठ्या पाण्यात ओढला गेला. त्याचा शोध सुरू होता. पोलिस आणि स्थानिकांच्या मदतीने काल सायंकाळपर्यंत त्याचा शोध घेण्यात आला. मात्र तो कुठेच दिसून आला नाही. आज सकाळी पुन्हा शोधकार्याला सुरुवात करण्यात आली. त्यानंतर दुपारच्या सुमारास त्याचा मृतदेह आढळून आला. जिथे सौरभ बुडाला होता तिथेच पुढील भागात त्याचा मृतदेह सापडला.