(दापोली)
दापोली तालुक्यातील दाभोळ बंदरामध्ये शुक्रवारी सायंकाळी ५ च्या दरम्यान सोन्याची जेजुरी ही बोट डिझेल तस्करी प्रकरणी कस्टम विभागाने पकडून आणली. या बोटीतून २४ हजार लिटर डिझेल साठा जप्त करण्यात आला आहे.
बोटीच्या मालकाचे नाव समजलेले नाही. बोटीवरील ४ खलाशांकडे चौकशी केली असता रात्री समुद्रामध्ये मोठ्या व्हेसलमधून डिझेल या बोटीत उतरून घेतल्याचे निष्पन्न झाले. बोटीमध्ये एकूण १७ कंपार्टमेंट असून त्यामधील २ कंपार्टमेंट रिकामे होते, तर १५ कंपार्टमेंटमध्ये साधारण २४ हजार लिटर डिझेल साठा असल्याचे सांगण्यात येते.
मागील महिन्यापासून समुद्रात परदेशी बोटींमधून भारतीय बोटींच्या माध्यमातून 50 मेट्रिक टन डिझेल तस्करी होतेय अशी माहिती कस्टम विभागाला प्राप्त झाल्यानंतर रत्नागिरी कस्टम टीमने हर्णे गुहागर समुद्री लाईन दरम्यान सापळा रचून 4/5 नोटिकल माईलमध्ये दुपारच्या सुमारास डिझेल नेत असताना संशयावरून बोट पकडली. त्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली.