(चिपळूण / वार्ताहर)
डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठ, दापोली अंतर्गत वनस्पती जैवतंत्रज्ञान केंद्राचे प्रमुख आणि प्राध्यापक डॉ. संतोष विष्णूपंत सावर्डेकर यांना अमेरीका येथे होणाऱ्या “कृषि जैवतंत्रज्ञान, जैवसुरक्षा आणि तंत्रज्ञान हस्तांतरण” या विषयावर मिशीगन स्टेट विद्यापीठ, अमेरीका येथे होणाऱ्या कार्यशाळेसाठी निमंत्रीत करण्यात आले आहे. या निवडीबद्दल डॉ. संतोष सावर्डेकर यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. रोहिदास समाज सेवा संघ चिपळूण या सामाजिक संघटनेचे नेते विष्णुपंत सावर्डेकर यांचे ते चिरंजीव आहेत.
जागतिक पातळीवरील आयोजित करण्यात आलेल्या या कार्यशाळेसाठी २५ देशातील जनुकीय परिवर्तीत पिके या संबंधित संशोधन करणाऱ्या शास्त्रज्ञांचा सहभाग असणार आहे. “जागतिक तंत्रज्ञान प्रवेश कर्यक्रम” या मिशीगन स्टेट विद्यापीठ येथे सुरू असलेल्या प्रकल्पांर्तगत दिनांक ५ ऑगस्ट, २०२३ ते १८ ऑगस्ट २०२३ दरम्यान ही कार्यशाळा होणार आहे. जनुकीय परिर्वतन पिकांच्या संशोधनाची दिशा, जैवसुरक्षेचे नियम आणि त्यांचा प्रसार करण्यासाठी धोरणे यावर विचार मंथन करण्यात येणार असून अमेरीकेतील मिशीगन, ओहीओ, आयोवा आणि वॉशिटन येथिल जैवतंत्रज्ञानावर आधारीत उद्योजक, शेतकरी आणि कृषि विद्यापीठे यांना भेटी आणि त्यांचे अनुभव आदान-प्रदान करण्यात येणार आहेत.
या कार्यशाळेमध्ये डॉ. सावर्डेकर “भारतातील पारजनुकीय पिकांच्या संशोधनाची दिशा” या विषयावर संशोधनपर लेख सादर करणार आहेत. डॉ. सावर्डेकर यांनी जैवतंत्रज्ञानाच्या सहाय्याने नाचणीची दापोली- २ जी जास्त खनिजे आणि अधिक उत्पादन देणारी जात विकसीत केली आहे. त्याचप्रमाणे भाताची क्षारप्रतिकार पनवेल- ३, नाचणी, वरी आणि वाली पिकांच्या जाती विकसीत करण्यासाठी सहभाग नोंदविला आहे. आपल्या २७ वर्षाच्या कालावधीत त्यांनी १०२ संशोधनपर लेख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालीकांमधुन प्रसिध्द केले आहेत. त्याचप्रमाणे त्यांनी कोलंबो, ढाका आणि देशांतर्गत पार पडलेल्या सेमिनार, कार्यशाळा यांमध्ये सहभाग घेऊन ७० प्रबंध सादर केलेले आहेत. डॉ. सावर्डेकर यांनी २७ पदव्युत्तर आणि ४ आचार्य पदवीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेले असुन राष्ट्रीय आणि राज्यपातळीवरील ५ पुरस्कारांनी त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे.
विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. संजय सावंत, कुलगुरू डॉ. संजय भावे आणि अधिष्ठाता डॉ. प्रशांत बोडके, सहयोगी अधिष्ठाता डॉ. प्रमोद सावंत यांनी डॉ. सावर्डेकर यांचे आमदार शेखर निकम यांच्यासह सावर्डेकर परिवार लायन्स क्लब सावर्डे शिक्षक मित्र सामाजिक प्रतिष्ठान या सर्वांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.