( दापोली / प्रतिनिधी )
दापोली तालुक्यात एक खळबळ उडवणारी घटना घडली आहे. दाभोळ येथील एका अल्पवयीन मुलीशी जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवून तिच्यावर मातृत्व लादणार्या तरुणावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुंदन दाभोळकर (23, दाभोळ) असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुंदन दाभोळकर याने डिसेंबर 2021 ते 27 सप्टेंबर 2022 या कालावधीत अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. दाभोळ येथील एका निर्जनस्थळी नेवून तिच्याशी वारंवार शरीरसंबंध ठेवले. यातून ही अल्पवयीन मुलगी गरोदर राहिली. मुलगी गरोदर राहिल्याचे कळताच घरच्यांनाही धक्का बसला. त्यानंतर काही महिन्यानंतर या गरोदर मुलीला मुंबईतील जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. या मुलीने एका मुलाला जन्म दिला आहे. त्यानंतर मुलीच्या आईने संशयित पुंदन दाभोळकर याच्याविरोधात येथील दाभोळ पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली.
मुलीच्या आईने दिलेल्या तक्रारीनुसार दाभोळ पोलिसांनी भादविकलम 376 (1) बालकांचे लैंगिक अपराधापासून संरक्षण 2012चे कलम 4 व 8 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.