( दापोली / प्रतिनिधी )
दापोली तालुक्यातील रुग्णालयात कॅल्शियम गोळ्यांचा तुडवडा असल्याने गरोदर मातांची हेळसांड होत आहे. गरोदर मातांना कॅल्शियम गोळ्या महत्वाच्या असतात. मात्र याच गोळ्या बाहेरून विकत घ्याव्या लागत आहेत. त्यामुळे आरोग्य विभागाने या गोळ्यांचा पुरवठा करावा, अशी मागणी दापोली तालुक्यातून करण्यात आली आहे.
उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे शहरी भागाला आरोग्यसेवा पुरवते तर प्रथमिक आरोग्य केंद्राद्वारे ग्रामीण भागाला आरोग्यसेवा पुरवली जाते. मागील दीड ते दोन वर्षे गरोदर मातांना दिल्या जाणाऱ्या कॅल्शियम गोळ्या उपलब्ध होत नसल्याने या गोळ्या खासगी औषधी दुकानातून गरोदर मातांना विकत घ्याव्या लागत आहेत. जन्माला येणारी पिढी कुपोषित होऊ नये, कमी वजनाची होऊ नये याकरिता गरोदर मातेलाच कॅल्शियम मिळाले नाही तर पुढची अपेक्षा करणे म्हणजे स्वप्न रंगवण्यासारखे आहे.
काही महिन्यांपूर्वी दापोली शहरातील एका नागरिकाला त्याच्या पत्नीकरिता अनेकवेळा कॅल्शियमच्या गोळ्या विकत घ्याव्या लागल्या आहेत. प्रधानमंत्री मातृवंदना योजनेचा लाभ त्यांचे अपत्य वर्षाचे होत आले तरी त्यांना मिळालेला नाही. त्यांनी याबाबत दापोलीतील आरोग्य विभाग, शहरी आरोग्य विभाग, जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्याशी संपर्क साधला. प्रधानमंत्री मातृवंदना योजना सांभाळणारे जिल्हा परिषदेचे दुबेवार यांनाही आपली कैफियत सांगितली; मात्र या योजनेचा लाभ त्यांच्या पत्नीला देण्यात आलेला नाही.
शासन विविध ठिकाणी मातांनी गरोदरपणापासून ते प्रसूतीपर्यंत कोणती काळजी घेतली पाहिजे. बालकांची काळजी कशी घ्यावी याबाबत माहिती दिली जाते. मात्र या मातांनाच या गोळ्या दिल्या जात नसतील तर या प्रसिद्धीचा उपयोग तरी काय? अशी विचारणा नागरिकांकडून करण्यात आली आहे.