(दापोली)
आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फाउंडेशन दापोली संस्थेची ४६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २५ डिसेंबर २०२२ रोजी महाविद्यालयाच्या सभागृहात उत्साहात संपन्न झाली. विद्यमान अध्यक्ष राजाभाऊ लिमये हे तब्बेत बरी नसल्याने उपस्थित राहू शकले नाहीत. म्हणून सदर सभेचे अध्यक्ष पद जानकीताई बेलोसे यांनी स्वीकारले. २०२२-२३ ते २०२६-२७ या शैक्षणिक कालावधीसाठी ४६ व्या वार्षिक सभेत नवीन कार्यकारी मंडळाची निवड करण्यात आली. या सभेसाठी मोठ्या प्रमाणात सभासद उपस्थि होते. तत्पूर्वी सभेत मागील वार्षिक अहवालाचे वाचन करण्यात आले. तसेच जमाखर्च सादर करून त्यास मंजुरी घेण्यात आली.
यावेळी संस्थेच्या संस्थेच्या अध्यक्षपदी आमदार श्री. संजय चंदूकाका जगताप यांची एकमताने बिनविरोध निवड करण्यात आली. संस्थेच्या उपाध्यक्षपदी माजी खासदार हुसेनभाई दलवाई आणि संस्थापक अध्यक्ष बाबूराव बेलोसे यांचे नातू आर्किटेक्चर श्री. आदित्य दिलीप बेलोसे यांची निवड झाली. संस्थेच्या कार्यवाह पदी डॉ. दशरथ भोसले यांची एकमताने बिनविरोध निवड झाली. डॉ. काकासाहेब भोसले हे सलग ३५ वर्ष बिनविरोध कार्यवाह पद सांभाळत आहेत. तसेच संस्थेच्या सहकार्यवाहपदी श्री. अनंत सणस यांची पुन्हा एकमताने निवड करण्यात आली. संस्थेचे विश्वस्त म्हणून श्री. कासम महालदार, रज्जाक काझी, श्री. धनंजय यादव यांची निवड करण्यात आली. कार्यकारणी संचालक म्हणून एकूण सोळा जणांची निवड करण्यात आली.
अध्यक्षपदी निवड झालेले आमदार संजय जगताप हे पुरंदर हवेली विधानसभा मतदार संघाचे आमदार आहेत. जगताप हे सध्या श्री. शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ सासवडच्या सचिव पदी, पुरंदर नागरी सह. पतसंस्था मर्या. सासवडचे चेअरमनपदी कार्यरत आहेत. तसेच संत सोपान काका सह. बँक लि. सासवडचे चेअरमन इत्यादी अनेक पदावर कार्यरत आहेत. याचबरोबर जगताप हे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे जिल्हा धर्मादाय रुग्णालय मोफत उपचार समिती, पुणे जिल्हा नियोजन समिती इ. शासकीय समितीमध्ये सदस्य आहेत. आर. व्ही. बेलोसे एज्युकेशन फौंडेशन दापोली संस्थेच्या अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर आपल्या मनोगतात त्यांनी आपली अध्यक्षडाची निवड ही आपण सर्वांनी विश्वासाने माझ्यावरती मोठी जबाबदारी दिली आहे. संस्थापक अध्यक्ष बाबूरावजी बेलोसे यांनी स्थापन केलेली ही संस्था वाढत जात आहे. संस्थात्मक कार्य करणारा आमचे परिवार आहे. मी शिक्षण क्षेत्रामध्ये १९८८ पासून कार्य करत आहे. वेगवेगळ्या व्यवसाय क्षेत्रात, को-ऑंपरेटीव्ह हॉस्पिटल, ग्रामीण भागात ओपीडि सुरु केली. मेडीकल क्षेत्रातही काम करत आहोत. आपल्या संस्थेचा विस्तार करण्याचे व प्रस्तावित असलेले विषय मार्गी लावण्याचे आश्वासन देवून अध्यक्षपद स्वीकारत आहे, असे म्हणाले.
सभेच्या अध्यक्षा श्रीम. जानकीताई बेलोसे यांनी अध्यक्षीय भाषण केले. त्यांनी आपल्या भाषणात अध्यक्ष राजाभाऊ लिमये यांच्या तब्बेतीच्या कारणास्तव उपस्थित राहू शकले नाहीत म्हणून त्यांनी कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या आहेत. संस्थेमार्फत चालविण्यात येणाऱ्या शाळा व महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांमध्ये शिस्त ठेवली आहे. त्याचप्रमाणे बाबूरावजी बेलोसे यांचे विचार प्रत्येक शेतकऱ्याच्या मुलाने शिक्षण घ्यावे असे होते. ते आम्ही पूर्ण करत आहोत. शेवटी कार्यवाह डॉ. काकासाहेब भोसले यांनी सर्वांचे आभार मानले.