(नवी दिल्ली)
दहावी आणि बारावीच्या परीक्षेला वर्षातून दोन वेळा बसणे विद्यार्थ्यांसाठी बंधनकारक नाही आणि एकाच संधीमुळे निर्माण होणारा तणाव कमी करण्यासाठी हा पर्याय आणला असल्याची माहिती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी रविवारी दिली. धर्मेंद्र प्रधान यांनी वृत्तसंस्थेला दिलेल्या विशेष मुलाखतीत सांगितले की, डमी शाळांच्या मुद्याकडे दुर्लक्ष करता येणार नाही आणि त्यावर गंभीर चर्चा करण्याची वेळ आली आहे.
विद्यार्थ्यांना जेईईसारख्या अभियांत्रिकी प्रवेश परीक्षेला वर्षातून दोनदा बसण्याचा पर्याय असेल. ते सर्वोत्तम गुण निवडू शकतात. परंतु, ते पूर्णपणे ऐच्छिक असेल, त्यांच्यावर कोणतीही सक्ती नसेल. कारण, विद्यार्थी अनेकदा आपले वर्ष वाया गेले, संधी गमावली किंवा ते चांगली कामगिरी करू शकले असते, या विचाराने तणावात असतात. म्हणून, केवळ एका संधीच्या भीतीने येणारा ताण कमी करण्यासाठी वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षेचा पर्याय दिला जात आहे.
ते पुढे म्हणाले, जर एखाद्या विद्यार्थ्याला वाटत असेल की तो पूर्णपणे तयार आहे आणि परीक्षेच्या पहिल्या संचाच्या गुणांवर तो समाधानी आहे, तर तो पुढील परीक्षेत बसण्याचा निर्णय घेऊ शकतो. काहीही अनिवार्य असणार नाही. वर्षातून दोनदा बोर्ड परीक्षा घेण्याच्या योजनेला विद्यार्थ्यांकडून सकारात्मक प्रतिसाद मिळाल्याचे प्रधान म्हणाले. नवीन शैक्षणिक धोरण जाहीर झाल्यानंतर, मी अनेक विद्यार्थ्यांना भेटलो. त्यांनी त्याचे कौतुक केले आणि ते आनंदीही आहेत. 2024 पासून वर्षातून दोनदा परीक्षा घेण्याचा आमचा प्रयत्न असल्याचे त्यांनी सांगितले.
कोट्यातील आत्महत्यांचा मुद्दा संवेदनशील
कोटा येथील विद्यार्थ्यांचा मुद्दा अतिशय संवेदनशील आहे. कुणीही आपला जीव गमावू नये. ती आपली मुले आहेत. विद्यार्थी तणावमुक्त राहतील याची खात्री करणे, ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. कोटा येथे यंदा 23 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या, ही आतापर्यंतची सर्वाधिक संख्या आहे. गेल्या वर्षी 15 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. विद्यार्थ्यांना कोचिंगची गरज भासू नये, यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे. मंडळाची पुनर्रचना केली जात आहे. दिल्ली आणि मद्रास या दोन आयआयटी त्यांचे परदेशात कॅम्पस स्थापन करण्याच्या प्रगत टप्प्यात आहेत आणि या संदर्भात स्वारस्य दर्शविणार्या इतर अनेक देशांशी चर्चा सुरू आहे, अशी माहिती प्रधान यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना दिली.